भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे स्पष्टीकरण

अहमदाबाद : फक्त एकाच क्रिकेट प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे स्वत:च्या तंदुरुस्तीला तसेच खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास माझे प्राधान्य असते. त्यामुळे विक्रमांचा विचार करणे फार पूर्वीच सोडून दिले आहे, असे मत भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने व्यक्त केले.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत अश्विनने ४०० बळींचा टप्पा गाठला. त्या पार्श्वभूमीवर भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या ६१९ बळींच्या विक्रमाला पिछाडीवर टाकण्यासंबंधी अश्विनला विचारण्यात आले. मात्र स्पष्टवक्त्या अश्विनने याबाबत चतुराईने उत्तर दिले.

‘‘अनिल कुंबळेची बरोबरी साधण्यासाठी मला अद्याप २१८ बळींची आवश्यकता आहे, असे काही दिवसांपूर्वीच एका संघसहकाऱ्याकडून समजले, कारण मुळात मी अशा विक्रमांचा विचार करणे फार वर्षांपूर्वीच सोडून दिले आहे,’’ असे ३४ वर्षीय अश्विन म्हणाला.

‘‘प्रत्येक दिवशी खेळपट्टीवर उतरल्यानंतर मी स्वत:च्या खेळात अधिक सुधारणा कशी करता येईल, याचाच विचार करतो. त्याशिवाय गेल्या तीन-चार वर्षांपासून मी फक्त कसोटी संघाचाच भाग आहे. त्यामुळे स्वत:ची तंदुरुस्ती राखणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे निवृत्त होईपर्यंत ही दोन ध्येये राखूनच खेळणार आहे,’’ असे अश्विनने सांगितले.

विलगीकरणामुळे संघातील एकजूट वाढली!

जैव-सुरक्षित वातावरणात राहताना विलगीकरणाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याने अनेक खेळाडूंनी याविषयी तक्रार केल्याचे आतापर्यंत निदर्शनास आले आहे, परंतु अश्विनने मात्र जैव-सुरक्षित वातावरणामुळे संघातील खेळाडू एकमेकांचे अधिक चांगले मित्र झाले असून त्यांच्यातील एकजूटता वाढली आहे, असे सांगितले. ‘‘जैव-सुरक्षित वातावरणात कुटुंबीयांपासून दूर राहणे कोणत्याही खेळाडूसाठी आव्हानात्मक असते, परंतु यामुळे आम्हा खेळाडूंना एकमेकांसह अधिक वेळ घालवण्याची संधी मिळते. मैदानावर सराव करण्याशिवाय हॉटेलमध्येही आम्ही अनेकदा एकत्र भोजन करतो. त्यामुळे जैव-सुरक्षेच्या नियमांमुळे ड्रेसिंग रूममधील वातावरणात फार बदल झाले आहेत,’’ असे अश्विन म्हणाला.