वेस्ट इंडिजबरोबर मायदेशी होणाऱ्या दोन सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १६ जणांच्या संघामध्ये सहा फलंदाज, पाच गोलंदाज तीन अष्टपैलू आणि एका यष्टीरक्षकाचा समावेश आहे. संघाची धुरा विराट कोहलीकडे आहे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे आहे. निवड समितीने इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत खराब कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये दिनेश कार्तिक, शिखर धवन आणि मुरली विजय यांचा समावेश आहे. दुखापतीमुळे इशांत शर्मा आणि आणि हार्दिक पांड्या यांची निवड करण्यात आली नाही. तर तिन्ही क्रिकेटमध्ये भारतीय संघामध्ये असणारे भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना आराम देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे इंग्लंड दौऱ्यामध्ये एकही कसोटी सामना न खेळणाऱ्या करूण नायरला निवड समितीने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. करूण नायर आणि रोहित शर्माची निवड न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवड समितीने अपेक्षेप्रमाणे पृथ्वी शॉची निवड केली आहे. वेस्ट इंडिजविरोधात पृथ्वी शॉ आपले कसोटी पदार्पण करणार आहे. पृथ्वी शॉ शिवाय मयांक अग्रवाल या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. राहुल, पृथ्वी आणि मयांक अग्रवाल यांच्यावर सलामीवीराची भूमिका असणार आहे. इंग्लंड विरोधातील शेवटच्या कसोटी सामन्यात निर्णायक कामगिरी करणाऱ्या हनुमा विहारीलाही संधी देण्यात आली आहे.

४ ऑक्टोंबरपासून दोन्ही देशांमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. पहिला सामना ४ ऑक्टोंबरपासून राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना १२ ऑक्टोंबरपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु होईल. वेस्ट इंडिचा संघ भारत दौऱ्यामध्ये दोन कसोटी, पाच एकदिवसीय सामने आणि तीन टी२० सामने खेळणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पूजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), हनुमा विहारी, आर. अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.

असा आहे वेस्ट इंडिजचा भारत दौरा –

कसोटी सामने – 
चार ते आठ ऑक्टोबर (राजकोट )
१२ ते १६ ऑक्टोबर (हैदराबाद )

एकदिवसी सामने –
२१ ऑक्टोबर (गुवाहाटी)
२४ ऑक्टोबर (इंदौर)
२७ ऑक्टोबर (पुणे )
२९ ऑक्टोबर (मुंबई)
१ नोव्होंबर (तिरुवनंतपूरम)

टी२० सामने – 
चार नोव्हेंबर (कोलकाता)
सहा नोव्हेंबर (लखनऊ)
११ नोव्हेंबर (चेन्नई)