भारतीय महिला फुटबॉल संघाने आशियाई क्रीडा स्पध्रेत मालदीवचा १५-० असा धुव्वा उडवून विजयी सलामी नोंदवली. विंगर सस्मिता मलिक आणि मध्यरक्षक कमला देवी यांनी प्रत्येकी पाच गोल नोंदवण्याची किमया साधली, तर आघाडीपटू बाला देवीने दोन गोल साकारले. कर्णधार बेम्बेम देवी, परमेश्वरी देवी व आशालता देवी यांनीसुद्धा प्रत्येकी एकेक गोल केला.
आशियाई क्रीडा स्पध्रेच्या उद्घाटनीय सोहळ्याच्या आठवडाभर आधीच फुटबॉल स्पध्रेला प्रारंभ झाला असून, अ-गटातील या विजयानिशी भारताने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान जवळपास पक्के केले आहे. भारताचा १७ सप्टेंबरला दक्षिण कोरियाशी आणि १९ सप्टेंबरला थायलंडशी सामना होणार आहे. अ-गटातील चार संघांपैकी तीन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. भारताने पहिल्या सामन्यात मध्यंतरालाच ९-० अशी आघाडी घेत आपले वर्चस्व दाखवून दिले.
पुरुषांची आज संयुक्त अरब अमिरातीशी सलामी
इन्चॉन : केंद्र सरकारच्या हिरव्या कंदीलाच्या प्रतीक्षेमुळे हेळसांड झालेल्या भारतीय पुरुष संघाची आशियाई क्रीडा स्पध्रेतील फुटबॉलमध्ये सोमवारी संयुक्त अरब अमिराती संघाशी गाठ पडणार आहे. २३-वर्षांखालील भारतीय संघाला सरकारने परवानगी देण्यास दिरंगाई केल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. भारतीय संघाची तिकीटे तिसऱ्यांदा रद्द करण्याची पाळी आल्यामुळे त्यांना शांघायमध्येच थांबावे लागले होते. ग-गटातील पहिली लढत भारताने गमावल्यास उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी भारताला झगडावे लागणार आहे. भारताचा साखळीतील दुसरा मुकाबला २२ सप्टेंबरला बलाढय़ जॉर्डनशी होणार आहे.