ज्या कोल्हापूरमधून कुस्ती सातासमुद्रापलीकडे गेली, तेथील पैलवानांना पुण्यात सराव करण्यासाठी यावं लागतं, हे पाहून वाईट वाटतं. म्हणूनच राज्य सरकारने कोल्हापूर येथे कुस्ती संकुल उभारावं, अशी मागणी जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा राहुल आवारे याने केली. पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित वार्तालापात तो बोलत होता.

राहुल म्हणाला की लहानपणापासून कोल्हापूरत तालीम करण्यासाठी गावामधील अनेक तरुण गेल्याचे पाहिले आहे. पण कोल्हापूर नगरीकडे सरकारने कधीही गांभिर्याने पाहिले नाही. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू पोहोचू शकले नाहीत. तुलनेने देशातील इतर राज्यात मात्र सरकारकडून त्यांच्या भागातील कुस्ती खेळाडूंना अत्याधुनिक सोयीसुविधा दिल्या जातात. म्हणूनच ते खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होते. आता यापुढील काळात कोल्हापूरसह इतर भागात कुस्ती क्षेत्रात येणार्‍या खेळाडूंना अत्याधुनिक सोयी सुविधा दिल्यास राहुल आवारेसारखे अनेक खेळाडू महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रतिनिधित्व  करतील. परदेशात भारताचे नाव उज्ज्वल करतील, अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली.

“मी गेली दहा वर्ष अनेक स्पर्धांमधून पदके जिंकली आहेत. आता मी ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागल्याची खंत कायम मनात राहिल. भविष्यात ही खंत भरून काढून मी निश्चितच सुवर्णपदक जिंकेन, असा विश्वास राहुलने व्यक्त केले.