कोलकाता : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिकेचे भवितव्य नरेंद्र मोदी आणि इम्रान खान या दोन देशांच्या पंतप्रधानांच्या हाती आहे, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) भावी अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केले.

भारत-पाकिस्तान यांच्यातील मालिकेसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना गांगुली म्हणाला की, ‘‘हा प्रश्न तुम्ही नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांना विचारा. आम्हाला कोणत्याही आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे सध्या तरी ‘बीसीसीआय’कडे या प्रश्नाचे उत्तर नाही.’’

२०१२मध्ये या दोन देशांमध्ये अखेरची मालिका खेळवण्यात आली होती. पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर दोन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळला होता. ४७ वर्षीय गांगुली २३ ऑक्टोबरला ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहे. १९९९च्या कारगील युद्धानंतर २००४मध्ये भारतीय संघ पाकिस्तानच्या ऐतिहासिक दौऱ्यावर गांगुलीच्याच नेतृत्वाखाली गेला होता. १९८९नंतर प्रथमच भारताने हा पाकिस्तान दौरा केला होता.

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा भागात १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानविरुद्ध गंभीर भूमिका घेताना दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रांविरुद्धचे सामने थांबवावेत, असे आवाहन ‘बीसीसीआय’ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) केले होते. ‘आयसीसी’ने पाकिस्ताची विश्वचषक स्पर्धेतून हकालपट्टी करावी, असे मत प्रशासकीय समितीने व्यक्त केले होते.

गांगुली आता ‘आयएसएल’चाही चेहरा!

कोलकाता : इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या पर्वाला रविवारपासून सुरुवात होणार असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी सज्ज असलेला गांगुली आता ‘आयएसएल’चाही चेहरा असणार आहे.

दोन वेळा विजेतेपद पटकावणारा अ‍ॅटलेटिको कोलकाता आणि केरळ ब्लास्टर्स यांच्यात रविवारी होणाऱ्या सलामीच्या सामन्याला गांगुली उपस्थित राहणार आहे. ‘‘या वेळी मी ‘आयएसएल’चा चेहरा असणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार असल्यामुळे रांची येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याला मुकणार आहे,’’ असे गांगुलीने सांगितले.

गांगुली हा सध्या अ‍ॅटलोटिको कोलकाताचा सहमालक आहे. ‘‘मी अ‍ॅटलेटिको सोबत असून लवकरच त्यांच्याशी माझ्या भूमिकेविषयी चर्चा करणार आहे. मी आता फक्त बंगाली दूरचित्रवाणीवरील ‘दादागिरी’ हा कार्यक्रम आणि अन्य उपक्रमामध्ये सहभागी होणार असून बाकी सर्व कार्यक्रम करणे थांबवणार आहे. मी आधीच दिल्ली कॅपिटल्सच्या सल्लागारपदाचा राजीनामा दिला आहे,’’ असे गांगुलीने सांगितले.