तीन वेळा विजेतेपद मिळविणारी सायना नेहवाल हिच्यावर भारताची इंडोनेशियन सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भिस्त आहे. या स्पर्धेच्या पात्रता फेरीस मंगळवारी येथे प्रारंभ होत आहे.
सायनाने या स्पर्धेत २००९, २०१० व २०१२ मध्ये अजिंक्यपद मिळविले होते. त्यामुळे तिच्याकडून भारतास पुन्हा चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. तिच्या लक्षणीय कामगिरीमुळेच भारतास नुकतेच उबेर चषक स्पर्धेत कांस्यपदक मिळविता आले होते. आठव्या मानांकित सायनास येथे पहिल्या लढतीत पोर्नतीप बुरानप्रसेत्र्सुक हिच्याशी खेळावे लागणार आहे. भारताच्याच पी.व्ही.सिंधू हिला पहिल्या लढतीत चीनच्या यिहान वाँग हिच्या आव्हानास खेळावे लागेल.
पारुपल्ली कश्यप याला पहिल्याच लढतीत चौथा मानांकित केनिची तागो याचे आव्हान असणार आहे. थायलंड ओपन विजेता किदम्बी श्रीकांत याला पहिल्या लढतीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूशी झुंज द्यावी लागेल.
महिलांच्या दुहेरीत ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांची इंडोनेशियाच्या पिया झेबादियाह बेर्नादीथ व रिझकी अमेलिया प्रदीप्ता यांच्याशी लढत होईल.