भारतीय ऑलिम्पिक महासंघास २०१९ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे (आयओए) संयोजनपद मिळविण्याची खात्री वाटत असून त्यांनी स्पर्धेसाठी येणारा खर्च व अन्य महत्त्वाच्या गोष्टींबाबत आशियाई ऑलिम्पिक महासंघाकडून माहिती मागवली आहे.
आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी आशियाई महासंघास पत्र लिहिले असून स्पर्धेचा आर्थिक प्रस्ताव सादर करण्यासाठी आशियाई महासंघाने वरिष्ठ अधिकारी पाठवावा, अशी विनंतीही केली आहे. ते म्हणाले, आमच्या संभाव्य प्रस्तावाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आर्थिक खर्चाबाबत आम्हाला तपशील मागितला आहे. त्याच्या आधारे आम्ही आशियाई महासंघास पत्र लिहिले आहे. आम्ही शासनास या संदर्भात एक सादरीकरण देणार आहोत व एक जुलैपूर्वी या स्पर्धेच्या संयोजनपदाचा प्रस्ताव आशियाई महासंघाकडे पाठविला जाईल.