भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन करण्यासाठी आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेकडे व्यासपीठ म्हणून पाहत नाही. सध्या तरी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नेतृत्वाच्या जबाबदारीकडे लक्ष केंद्रित केले आहे, असे अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने सांगितले.

युवराज सिंग, आरोन फिंच आणि ख्रिस गेल यांच्यासारखे मातब्बर खेळाडू संघात असतानाही सोमवारी अश्विनकडे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या नेतृत्वाची धुरा सोपववण्यात आली. अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघांमधील स्थान गमावले आहे. जुलै २ ०१७मध्ये अश्विन अखेरचा सामना खेळला होता.

‘‘यंदाच्या आयपीएलकडे मी भारतीय संघातील पुनरागमनाच्या दृष्टीने पाहात नाही. प्रत्येक वर्षीप्रमाणे मी आयपीएलकडे विशिष्ट दृष्टिकोनातून पाहतो. यावेळी पंजाबच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या आव्हानासाठी मी सज्ज आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीचा मी सध्या विचार करीत नाही. भारतासाठीचे पुनरागमन हे भविष्यात गरज असल्यास होईलच,’’ असे अश्विनने सांगितले.

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी अश्विन आणि जडेजा यांची निवड होण्याची शक्यता नाही. कारण मनगटी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव अप्रतिम गोलंदाजी करीत आहेत. परंतु आयपीएलमध्ये अश्विन फक्त कर्णधार नव्हे, तर अनुभवी गोलंदाज म्हणूनसुद्धा दिसणार आहे. या आव्हानाविषयी अश्विन म्हणाला, ‘‘जवळपास दहा वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असल्यामुळे संघातील अनुभवी खेळाडूंना हाताळताना समस्या जाणवेल, असे वाटत नाही. पंजाबकडून नामांकित खेळाडूंचा सांघिक खेळ दिसेल.’’