आयपीएलच्या अकराव्या हंगामाआधी आयोजित करण्यात आलेल्या स्वागत सोहळ्याच्या तारखांमध्ये बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने बदल केले आहेत. हा सोहळा आता ६ एप्रिल ऐवजी ७ एप्रिल रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सीलतर्फे तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र प्रशासकीय समितीने या निधीमध्येही कपात केल्याचं कळतंय. याचसोबत मुंबईच्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मैदानात रंगणारा हा स्वागत सोहळा आता सामन्याच्या काही तास आधी वानखेडे मैदानावर रंगणार आहे.

अवश्य वाचा – खेळाडूंचे सामन्यांचे मानधन बीसीसीआयकडून थकित

सुरुवातीला आयपीएलच्या स्वागत सोहळ्यासाठी तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला होता. मात्र क्रिकेट प्रशासकीय समितीने या खर्चावर कात्री चालवत २० कोटी रुपयांचं बजेट मंजूर केलं आहे. त्यामुळे आयपीएलचे गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणाऱ्या सलामीच्या लढतीआधी आयपीएलचा स्वागत सोहळा पार पाडला जाईल. मात्र आयपीएलच्या सामन्यांच्या वेळापत्रकात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीयेत.

अवश्य वाचा – बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी राजस्थानचे माजी पोलीस महासंचालक अजित सिंह?