IPL 2019 CSK vs KKR : चेन्नई विरुद्ध कोलकाता या सामन्यात दीपक चहरचा भेदक मारा आणि त्याला हरभजन व इम्रान ताहीर यांची मिळालेली साथ यामुळे चेन्नईने कोलकाताला २० षटकात ९ बाद १०८ धावांमध्ये रोखले. आंद्रे रसलने एकाकी झुंज देत अर्धशतक केले, पण त्यामुळे धावसंख्येत फारसा फरक पडला नाही. शेवटच्या टप्प्यात त्याने केलेल्या फटकेबाजीमुळे कोलकाताला केवळ शंभरी गाठता आली.

सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर ख्रिस लिनला दीपक चहरने शून्यावर पायचीत केले. तर सुनील नरिनला हरभजन सिंगने ६ धावांवर झेलबाद केले. डावाच्या सुरुवातीला दुहेरी धक्क्यातून सावरण्याआधीच नितीश राणा माघारी परतला. त्यालाही दीपक चहरने शून्यावर माघारी धाडले. फटकेबाजी करत डावाला स्थैर्य देण्याच्या प्रयत्नात रॉबिन उथप्पाही स्वस्तात झेलबाद झाला. २ चौकार लगावत ११ धाव करून तो माघारी परतला. त्यामुळे कोलकाताची अवस्था ४ बाद २४ अशी झाली.

जबाबदारीने खेळ करण्याची कर्णधार दिनेश कार्तिककडून अपेक्षा होती, पण फटकेबाजीच्या प्रयत्नात तो देखील झेलबाद झाला. त्याने २१ चेंडूत १९ धावा केल्या. युवा खेळाडू शुभमन गिल याला आजच्या सामन्यात चांगली करून दाखवण्याची संधी होती. पण तो इम्रान ताहिरच्या गोलंदाजीवर यष्टीचित झाला आणि कोलकाताला सहावा धक्का बसला. त्याने ९ धावा केल्या. काही काळ खेळपट्टीवर तग धरल्यावर पियुष चावला माघारी गेला. त्याने १३ चेंडूत ८ धावा केल्या. पाठोपाठ कुलदीप यादव (०) धावचीत झाला. लगेचच प्रसिधदेखील (०) झेलबाद झाला. रसलने एकाकी झुंज देत ४४ चेंडूत ५० धावा केल्या. त्याच्या फलंदाजीमुळे कोलकाताने २० षटकांत ९ बाद १०८ धावा केल्या.

दीपक चहरने २० धावांत ३ बळी टिपत चेन्नईला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यानंतर हरभजनने १५ धावा देत २ बळी टिपले. इम्रान ताहीरने देखील विश्वास सार्थ ठरवत २१ धावांत २ बळी घेतले. तर जाडेजाने चांगली गोलंदाजी करत १७ धावा देत १ बळी टिपला.