बुधवारी घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करत पंजाबवर १७ धावांनी मात केली. बंगळुरुने दिलेल्या २०२ धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघ ७ गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावांपर्यंतच मजल मारु शकला. पंजाबने हा सामना गमावला असला तरीही सलामीवीर लोकेश राहुलने यादरम्यान आपल्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.

लोकेश राहुलने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात २७ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या दरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये राहुलने ३ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सर्वात जलद ३ हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर आहे. याचसोबत आशिया खंडात सर्वात जलद ३ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने दुसरं स्थान मिळवलं आहे. तर भारतीय फलंदाजांच्या निकषात तो पहिल्या स्थानावर आला आहे. याआधी सुरेश रैना आणि गौतम गंभीर यांनी १०७ डावांमध्ये ३ हजार धावांचा टप्पा गाठला होता.

दरम्यान, डिव्हीलियर्सच्या धडाकेबाज नाबाद ८२ धावांच्या खेळीच्या जोरावर बंगळुरूने पंजाबला विजयासाठी २०३ धावांचे आव्हान दिले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा संघ ७ बाद १८५ धावांपर्यंतच मजल मारू शकला. निकोलस पूरन, ख्रिस गेल, लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी छोटेखानी तुफानी खेळी केली, पण या खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. बंगळुरूने हंगामातील चौथा विजय मिळवत प्ले ऑफच्या शर्यतीमधलं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : RCB ची ‘स्टेन’गन थंडावली, खांद्याच्या दुखापतीमुळे माघार