आयपीएलच्या बाराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासमोरचं संकट काही केल्या कमी होत नाहीयेत. नॅथन कुल्टर-नाईलच्या बदलात संघात जागा मिळालेल्या डेल स्टेननेही दुखापतीमुळे माघार घेतली आहे. स्टेनच्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे, उरलेला हंगाम स्टेन सामने खेळू शकणार नाहीये. बंगळुरुच्या गेल्या दोन सामन्यांमधली विजयात स्टेनने महत्वाची भूमिका बजावली होती.

“स्टेनच्या खांद्याला दुखापत झाली असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे यापुढील कोणत्याही सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाहीये. स्टेन संघात असल्याचा संपूर्ण खेळाडूंना फायदा झाला होता. त्याची उणीव आम्हाला नक्कीच भासेल, तो लवकर बरा होवो अशी आम्ही प्रार्थना करतो.” बंगळुरुच्या संघाने स्टेनच्या दुखापतीबद्दल माहिती दिली.

बाराव्या हंगामात बंगळुरुकडून दोन सामन्यांमध्ये स्टेनने ४ बळी घेतले. स्टेनच्या पुनरागमनामुळे बंगळुरुच्या गोलंदाजांची कामगिरी काहीप्रमाणात सुधारली. त्यामुळे स्टेनच्या अनुपस्थितीत बंगळुरुचे गोलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.