दिल्लीविरुद्धच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी कोलकाता उत्सुक

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

कोलकाता : धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलची मुक्त फटकेबाजी आणि कॅगिसो रबाडाचे अचूक यॉर्कर हा संघर्ष शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) क्रिकेटरसिकांना पाहायला मिळणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा पाहुण्या दिल्ली संघाला मार्गदर्शन करणार आहे.

रसेलच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर सहा सामन्यांत आठ गुण मिळवणाऱ्या कोलकाताने ‘आयपीएल’ गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे. रसेलने पाच डावांमध्ये २५७ धावा काढल्या असून, यापैकी १५० धावा या षटकारांच्या बळावर काढल्या आहेत. त्याची सरासरी १२८.५० आहे, तर स्ट्राइक रेट २१२.३९ आहे.

मागील सामन्यात कोलकाताला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. फिरकी गोलंदाजांनिशी अप्रतिम चक्रव्यूह रचून कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कोलकाताला वेसण घातली होती. कोलकाताचा हा यंदाच्या हंगामातील दुसरा पराभव ठरला. याआधी फिरोझशाह कोटला मैदानावर झालेल्या ‘सुपरओव्हर’च्या नाटय़ात कोलकाताने हार पत्करली होती. त्या वेळीसुद्धा रबाडाने रसेलविरुद्ध सरशी साधली होती.

दिल्लीचे ११ धावांचे विजयी लक्ष्य पेलताना रसेलने पहिल्याच चेंडूवर रबाडाला चौकार खेचला होता. मात्र दुसऱ्या चेंडूवर अचूक यॉर्करसह रबाडाने रसेलची मधली यष्टी भेदली होती. यंदाच्या हंगामातील हा सर्वोत्तम चेंडू रबाडाने टाकला, असा गौरव गांगुलीने केला होता. दिल्लीकडून पत्करलेल्या पहिल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी कोलकाताचा संघ उत्सुक आहे.

दिल्लीच्या खात्यावर सहा सामन्यांत सहा गुण जमा आहेत. आता हंगामातील चौथा विजय साकारून गुणतालिकेतील अव्वल पाच संघांमध्ये पोहोचण्यासाठी दिल्ली उत्सुक आहे. दिल्लीच्या वेगवान माऱ्याची धुरा दक्षिण आफ्रिकेचा २३ वर्षीय वेगवान गोलंदाज रबाडा सांभाळत आहे. या सामन्यात खेळपट्टीची भूमिकासुद्धा महत्त्वाची असणार आहे. शुक्रवारी ईडन गार्डन्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

संघ

’ कोलकाता नाइट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार व यष्टीरक्षक), रॉबिन उथप्पा, ख्रिस लीन, शुभमन गिल, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रेथवेट, सुनील नरेन, पीयूष चावला, कुलदीप यादव, निखिल नाईक, जोए डेन्ली, श्रीकांत मुंढे, नितीश राणा, संदीप वारियर, प्रसिध कृष्णा, लॉकी फग्र्युसन, हॅरी गुरने, के. सी. करिअप्पा, यारा पृथ्वीराज, मॅट केली.

’ दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कॉलिन इन्ग्राम, मनजोत कालरा, पृथ्वी शॉ, शेरफाने रुदरफोर्ड, शिखर धवन, अमित मिश्रा, आवेश खान, बंडारु अयप्पा, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, नाथू सिंग, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस, कॉलिन मुन्रो, हनुमा विहारी, जलाज सक्सेना, किमो पॉल, राहुल तेवतिया, अंकुश बेन्स.

’ सामन्याची वेळ : रात्री ८ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १