आयपीएलच्या आगामी बाराव्या हंगामासाठी अजिंक्य रहाणे, राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरताना दिसणार आहे. स्पॉट फिक्सींगप्रकरणी बंदीची शिक्षा भोगून पुनरागमन करणाऱ्या राजस्थानच्या संघाला मागील हंगामात स्टिव्ह स्मिथला संघात खेळवता आलं नव्हतं. मात्र यंदाच्या हंगामात स्टिव्ह स्मिथ आयपीएलमध्ये पुनरागमन करणार आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेने स्मिथचं संघात स्वागत केलं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग केल्याप्रकरणी स्टिव्ह स्मिथला एका वर्षाच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र यानंतर स्मिथच्या पुनरागमनाबद्दल विचारलं असताना अजिंक्य म्हणाला, एक खेळाडू म्हणून स्टिव्ह स्मिथच्या कार्यक्षमतेवर आमचा विश्वास आहे, त्याने आतापर्यंत राजस्थान संघासाठी चांगलं काम केलं आहे. चुका या प्रत्येकाकडून होतात, मात्र तरीही संघाचा स्टिव्ह स्मिथला पूर्ण पाठींबा आहे. त्याचा अनुभव संघासाठी व आपल्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचंही अजिंक्यने स्पष्ट केलं.

यंदाच्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने आपल्या गणवेशात बदल केला असून, राजस्थानचा संघ गुलाबी गणवेशात मैदानात उतरणार आहे. 23 मार्चपासून आयपीएलच्या बाराव्या हंगामाला सुरुवात होईल. सध्या अजिंक्य रहाणे नागपुरात इराणी चषकामध्ये शेष भारत संघाचं नेतृत्व करतो आहे.

अवश्य वाचा – ऋषभ पंत विश्वचषकासाठी संघात हवाच – मोहम्मद अझरुद्दीन