बाद फेरी गाठण्यासाठी आज दोन्ही संघांना विजय आवश्यक

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थित खेळणाऱ्या सनरायजर्स हैदराबादपुढे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटची बाद फेरी गाठण्यासाठी उर्वरित दोन्ही साखळी सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला नमवण्याचे प्रमुख आव्हान त्यांच्यापुढे असेल.

‘आयपीएल’ गुणतालिकेत सध्या मुंबई इंडियन्सचा संघ तिसऱ्या स्थानावर असून, त्यांनी १२ सामन्यांतून १४ गुण मिळवले आहेत, तर हैदराबादने १२ सामन्यांमध्ये १२ गुण कमावले आहेत. त्यामुळे बाद फेरी गाठण्यासाठी मुंबईला एक, तर हैदराबादला दोन विजयांची आवश्यकता आहे. गुरुवारी मुंबईचा संघ जिंकल्यास ते बाद फेरीसाठी थेट पात्र होतील, परंतु हैदराबादचा संघ जिंकल्यास दोन्ही संघांनी अखेरच्या सामन्यापर्यंत वाट पाहावी लागेल. वानखेडेवरील वर्चस्व यंदा मुंबईला राखता आलेले नाही. त्यांना यंदाच्या हंगामात पाचपैकी तीनच लढती जिंकता आलेल्या ओहत.

वॉर्नरने हैदराबादच्या सुरुवातीच्या प्रवासात धडाकेबाज फलंदाजी करीत १२ सामन्यांतून ६९२ धावा केल्या आहेत. मात्र विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीच्या राष्ट्रीय शिबिरात सामील होण्यासाठी तो मायदेशी परतला आहे. परंतु त्याच्या अनुपस्थितीत कर्णधार केन विल्यम्सन, मनीष पांडे, अष्टपैलू विजय शंकर आणि वृद्धिमान साहा यांनी जबाबदारीने खेळण्याची आवश्यकता आहे.

मुंबई इंडियन्सच्या आव्हानाची धुरा दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक (१२ सामन्यांत ३९३ धावा) आणि कर्णधार रोहित शर्मा (११ सामन्यांत ३०७ धावा) यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून आहे. याशिवाय अष्टपैलू हार्दिक पंडय़ा (१२ सामन्यांत ३५५ धावा) आणि वेस्ट इंडिजचा किरॉन पोलार्ड (१२ सामन्यांत २२८ धावा) सामन्याला कलाटणी देण्यात वाकबदार आहेत. सूर्यकुमार यादव आणि कृणाल पंडय़ा यांच्याकडेही मोठी खेळी साकारण्याची क्षमता आहे.

हैदराबादच्या गोलंदाजीची भिस्त रशीद खानवर (१४ बळी) आहे. याशिवाय संदीप शर्मा (११ सामन्यांत १२ बळी), खलील अहमद (६ सामन्यांत ११ बळी), अनुभवी भुवनेश्वर कुमार (१२ सामन्यांत ८ बळी) असा वैविध्यपूर्ण मारा त्यांच्याकडे आहे.

मुंबईला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनड्रॉफशिवाय खेळावे लागणार आहे.

संघ

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी’कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, युवराज सिंग, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, मिचेल मॅक्क्लिनॅघन, मयांक मरकडे, राहुल चहर, जसप्रीत बुमरा, अनमोलप्रीत सिंग, सिद्धेश लाड, अनुकूल रॉय, एव्हिन लेविस, पंकज जैस्वाल, बेन कटिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), आदित्य तरे, रसिक सलाम, बिरदर शरण, जयंत यादव, ब्युरन हेंड्रिक्स, लसिथ मलिंगा.

सनरायजर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), बॅसिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, दीपक हुडा, मनीष पांडे, टी. नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, श्रीवत्स गोस्वामी, खलील अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, रशीद खान, मोहमद नबी, शाकिब अल हसन, वृद्धिमान साहा, मार्टिन गप्टिल, विजय शंकर, अभिषेक शर्मा, शाहबाझ नदीम.

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १