IPL 2019 स्पर्धा २३ मार्चपासून सुरु होत आहे. स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना IPL चे थीम सॉंग गेल्याच आठवड्यात लॉंच करण्यात आले. या थीम साँगमध्ये #GameBanayegaName या आशयाने ‘नाव नको खेळ दाखवा’ असे आव्हान चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हे तिघे नव्या दमाच्या खेळाडूंना देताना दिसत आहेत. मात्र यावर उत्तर म्हणून एका वाहिनीची जाहिरात तुफान व्हायरल होत आहे.

या जाहिरातीत चाळीतील लहान मुले क्रिकेट खेळण्यासाठी संघ मागत असतात. प्रत्येक जण IPL मधील आवडत्या खेळाडूची जर्सी परिधान करून उभा असतो. संघ मागण्यास सुरुवात होते. रोहित शर्मा, धोनी, शिखर धवन, ख्रिस गेल अशी स्वतःची नावे ठेवलेल्या खेळाडूंना दोन कर्णधार आपल्या संघात घेत असतात. त्यात बंगळुरूची जर्सी घातलेल्या खेळाडूला एक कर्णधार ‘कोहली तू माझ्या संघात ये’, असे म्हणतो. त्यावर तो चिमुरडा मला कोहली नाही तर ओंकार पटवर्धन बनायचे आहे, असे म्हणतो. म्हणजेच मला कोणी इतर खेळाडू म्हणून ओळख मिळवायची नाही, तर मला स्वतःची नवी ओळख निर्माण करायची आहे, असे त्याच्या बोलण्याचा आशय असतो. पण सगळे त्याची टिंगल करतात. अखेर कोहली स्वतः तेथे येतो आणि त्याला ‘नाव नसलं म्हणून काय झालं, खेळ तर आहे ना’ असे म्हणत प्रोत्सहन देतो. त्यानंतर सर्व जण, अगदी कोहलीसुद्धा ओंकारच्या नवाने जयघोष करू लागतो, असे जाहिरातीत दाखवले आहे.

या आधी गेल्या आठवड्यात IPL 2019 चे ९० सेकंदांचे थीम सॉंग लॉंच झाले होते. या व्हिडीओमध्ये एक स्थानिक खेळाडूंचा सर्वसाधारण मुलांचा गट क्रिकेट खेळताना दिसत आहे. तर दुसऱ्या ठिकाणी नामांकित क्रिकेटपटूंचा ग्रुप क्रिकेट खेळताना दाखवला आहे. हे दोन गट खेळत असताना यांच्यात भांडण होते. अखेर हे भांडण सोडवण्यासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रोडरोलर घेऊन येतो. तो धोनी पहिल्या गटातील स्थानिक मुलांना आपल्याकडे बोलावतो. त्यानंतर ही मुले आपले नाव सांगण्याचा प्रयत्न करतात. पण कोहली-धोनी-रोहित हे तिघे त्या मुलांना ”नाव नको खेळ दाखवा” असे आव्हान देतात, असे दाखवले होते.

दरम्यान, या स्पर्धेत पहिला सामना विराट कोहलीच्या बंगळुरु आणि धोनीच्या चेन्नई संघात होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी रोहित शर्माच्या मुंबईची लढत दिल्लीशी होणार आहे.