IPL 2019 या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आणि या स्पर्धेचे साऱ्यांना वेध लागले. २३ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेच्या पहिल्या २ आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, या स्पर्धेचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगणार आहे. माजी कर्णधार विरुद्ध सध्याचा कर्णधार असा सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. तसेच आजी-माजी कर्णधारांमधील लढतींबरोबरच दुसऱ्या दिवशी या स्पर्धेत भारताच्या दोन सलामीवीरांमधील सामना रंगणार आहे. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ विरुद्ध शिखर धवनचा दिल्ली कपिटल्स संघ या स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात आमनेसामने येणार आहेत. २४ मार्चला हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे. पण या स्पर्धेमध्ये सुरुवातीला पंजाबच्या संघात असलेला युवराज मुंबईच्या संघातून यंदाचे IPL खेळणार असल्याने या सामन्यालाही तितकेच महत्व असणार आहे.

वानखेडे स्टेडियममध्ये २०११च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना झाला, हा क्षण युवराजला अजूनही आठवतो आहे. भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत करून विश्वचषक जिंकला. त्या विश्वचषक विजयात युवराजचा मोलाचा वाटा होता. कॅन्सरशी झगडत असूनही कोणालाही त्याची खबर होऊ न देता युवराज त्या स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या बरोबर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या मैदानात सरावासाठी उतरताना युवीला पुन्हा एकदा २०११ चा अंतिम सामना आठवला.

हा विश्वचषक टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. या स्पर्धेत युवराजला मालिकावीराचा किताब देण्यात आला होता. युवराजने त्या स्पर्धेत ९०.५०च्या सरासरीने ३६२ धावा केल्या होत्या. तसेच १५ बळीही टिपले होते. दरम्यान, IPL 2019 (12व्या) हंगामाला २३ मार्चला सुरूवात होणार आहे. यात मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २४ मार्चला वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स यांच्याशी होणार आहे. या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या युवराजच्या कामगिरीवर सर्व नजरा आहेत. मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास युवराज अतिशय उत्सुक आहे. तो या स्पर्धेसाठी कसून तयारीदेखील करत आहे.

मुंबईच्या संघाने अगदी शेवटच्या क्षणाला युवराजला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मुंबई इंडियन्सने युवराजला १ कोटीच्या मुळ किमतीत खरेदी केले. २०१८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला २ कोटीच्या मुळ किमतीत घेतले होते. परंतु त्याला ८ सामन्यांत फक्त ६५ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे त्याला पंजाबने करारमुक्त केले. आता यंदाच्या IPL मध्ये त्याला चांगली कामगिरी करून दाखवण्याची संधी आहे.