आयपीएलचा बारावा हंगाम आता हळूहळू उत्तरार्धाच्या दिशेने प्रवास करतो आहे. प्ले-ऑफच्या गटात प्रवेश कऱण्यासाठी सर्व संघ प्रयत्नशील आहेत. मध्यरात्रीपर्यंत रंगणाऱ्या सामन्यांना चाहते आवर्जून हजेरी लावत आहेत. गेल्या हंगामाप्रमाणेच यंदाच्या हंगामातही, टीव्हीवर आयपीएलचे सामने पाहणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसते आहे. मात्र यामध्ये महिला आणि लहानग्या चाहत्यांनी आघाडी घेतली आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : पंजाबने सामना गमावला मात्र लोकेश राहुल ठरला विक्रमवीर

पहिल्या ४ आठवड्यांमध्ये ४१.१० कोटी लोकांनी आयपीएलच्या सामन्यांना पसंती दिली आहे. गेल्या हंगामात हा आकडा ४१.४० कोटी इतका होता. यामध्येही महिला आणि लहान मुलांची संख्या ५२ टक्के इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत, पहिल्या चार आठवड्यांचा निकष लावला तर महिलां प्रेक्षकांच्या संख्येत १५ टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी महिला चाहत्यांच्या संख्येमध्ये ८ कोटी ८० लाखांची वाढ झाली होती. यंदाच्या हंगामात ही वाढ १० कोटी १० लाखापर्यंत पोहचली आहे.

बाराव्या हंगामातला प्रत्येक सामना हा शेवटच्या क्षणापर्यंत रंगतो आहे. त्यातच फलंदाजांची आक्रमक फटकेबाजी, गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये टिच्चून केलेला मारा यामुळे चाहते हे टीव्ही सेटला चिकटून बसलेले असतात. त्यामुळे यंदाच्या हंगामात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : RCB ची ‘स्टेन’गन थंडावली, खांद्याच्या दुखापतीमुळे माघार