IPL 2020 स्पर्धा युनायटेड अरब अमिराती (UAE) मध्ये खेळवली जाणार आहे. IPL गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबद्दल माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल असं पटेल म्हणाले. स्पर्धेच्या तारखांबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून, २६ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर या काळात IPL 2020चे आयोजन केले जाण्याची शक्यता रंगली आहे. UAEमध्ये IPLचा हंगाम रंगल्यावर त्याचा फायदा कोणत्या संघाला अधिक होईल याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे.

“UAEमध्ये IPL स्पर्धा होणार असल्याचा परिणाम फलंदाजांवर फारसा होणार नाही. पण काही संघांना मात्र नक्की हायसं वाटेल. उदाहणार्थ RCBसारख्या संघाला याचा थोडा फायदाच होईल. कारण जेव्हा मैदान मोठं असतं, तेव्हा तुमच्या गोलंदाजांची धुलाई होण्याची शक्यता थोडीशी कमी होते. RCBला UAEमधील IPLचा नक्कीच फायदा होईल”, असे आकाश चोप्रा म्हणाला.

“अशा खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. ज्या संघात फिरकीपटू जास्त असतील तो संघ स्पर्धेत चांगली कामगिरी करेल असा माझा अंदाज आहे. म्हणजेच चेन्नई सुपर किंग्ज या हंगामातही ‘सुपर किंग्ज’ ठरू शकतील. त्याशिवाय मॅक्सवेलची UAEमधील कामगिरी पाहता, ती पंजाबच्या संघासाठी जमेची बाजू ठरून शकेल. एकंदरीत या हंगामात फलंदाजांना थोडा बचावात्मक पवित्रा घेऊन फटकेबाजी करावी लागणार आहे. आणि ऊर्जादेखील वाचवावी लागणार आहे. कारण यंदा अनेक दिवस ‘डबल-हेडर’ सामने असू शकतील”, असेही तो म्हणाला.