भारत-इंग्लंड कसोटी मालिकेनंतर आता सर्वांना आयपीएलचे वेध लागले आहे. आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा यूएईत आयोजित केला जात असून पहिला टप्पा भारतात खेळवण्यात आला होता. खेळाडूंना करोनाचे संक्रमण झाल्यामुळे यंदाचा हंगाम अर्ध्यातच थांबवण्याचा निर्णय घेतला.

१९ सप्टेंबरपासून आयपीएल २०२१ला सुरुवात होत असून बीसीसीआयने फ्रेंचायझींना सूचना दिल्या आहेत. यूकेमधून यूएईला येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला संघात सामील होण्यापूर्वी सहा दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल, असे बीसीसीआयने सांगितले. इंग्लंडला गेलेले सर्व भारतीय खेळाडू बायो बबलमध्ये सामील होण्यापूर्वी क्वारंटाइन असतील. एएनआयशी बोलताना एका अधिकाऱ्याने याची पुष्टी केली.

मँचेस्टरमधील भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम कसोटी रद्द झाल्याने शुक्रवारी आयपीएल फ्रेंचायझींनी चार्टर कंपन्यांच्या संपर्कात यूएईमध्ये आपले खेळाडू बोलावण्यास सुरुवात केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांना रविवारी सकाळी दुबईला आणण्यासाठी चार्टर फ्लाइटची व्यवस्था करत आहे.

शनिवारपर्यंत संघाचा भाग असलेल्या भारतीय खेळाडूंना दुबईला आणण्याचा चेन्नई सुपर किंग्सचा प्रयत्न आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले, की रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर आणि चेतेश्वर पुजारा हे दुबईसाठी उड्डाण करू शकतात की नाही याचा शोध संघ घेत आहे.

हेही वाचा – सत्य आलं समोर; ‘या’ कारणामुळं धोनी मित्रांसोबत जेवायला जाताना स्वत: जवळ फोन ठेवत नाही!

पहिलाच सामना असणार ब्लॉकबस्टर!

आयपीएलचा १४वा हंगाम चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता मुंबई इंडियन्स यांच्यातील ब्लॉकबस्टर सामन्याने पुन्हा सुरू होईल. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. शारजाहमध्ये २४ सप्टेंबरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सामना खेळेल. दुबईमध्ये १३, शारजाहमध्ये १० आणि ८ सामने होणार आहेत.