रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आयपीएलच्या 14व्या सत्रात पर्पल कॅप स्वत: कडे राखली आहे. लीगमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांला पर्पल कॅप देण्यात येते.

हर्षलने या मोसमात आतापर्यंत 9 विकेट्स, दिल्लीच्या आवेश खानने आणि मुंबईच्या राहुल चहरने प्रत्येकी 8 गडी बाद केले आहेत. चहरचा सहकारी ट्रेंट बोल्ट 6 विकेट्ससह पहिल्या चारमध्ये आहे.

दिल्लीच्या कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानला आयपीएलच्या 13व्या सामन्यात दोन बळी मिळाले आहेत. तर, या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या राहुल चहरला एक विकेट मिळाली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्राने मंगळवारी झालेल्या सामन्यात मुंबईविरुद्ध 4 गडी बाद केले.

दिल्लीची मुंबईवर मात

फिरकीपटू अमित मिश्राने केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर 6 गडी राखून विजय मिळवला. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचे स्टार फलंदाज मोठी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. फिरकीला मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकात 9 बाद 137 धावा उभारल्या. रोहितव्यतिरिक्त (44) मुंबईच्या इतर फलंदाजांनी निराशा केली. आज दिल्ली संघात संधी मिळालेल्या अनुभवी अमित मिश्राने 4 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने केवळ 4 गडी गमावले. मिश्राला सामनावीर पुरस्कार मिळाला. तब्बल 10 वर्षानंतर दिल्लीने या मैदानावर विजय साकारला आहे. याआधी 2010मध्ये त्यावेळच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने चेन्नई सुपर किंग्जला चेन्नईत 6 गड्यांनीच मात दिली होती.