आयपीएलच्या सातव्या मोसमासाठी झालेल्या लिलावात भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगसाठी लिलाव व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे चार कोटी जास्त मोजावे लागल्याची तक्रार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मालक विजय मल्ल्या यांनी केली आहे.
आयपीएलच्या सातव्या मोसमासाठी काल(बुधवार) झालेल्या लिलावात युवराजसाठी बंगळुरू संघाला तब्बल १४ कोटी मोजावे लागले. त्यानंतर विजय मल्ल्यांनी आपल्या ट्विटरवर, मी युवराजसाठी जास्तच मोजले, पण तो संघात हवाच असा कर्णधार विराट कोहलीचा आग्रह होता आणि तो मला मान्य असल्याचे म्हटले होते.
परंतु, आज विजय मल्ल्यांनी लिलावात व्यवस्थापनाकडून चूक घडल्याचे विजय मल्ल्यांचे म्हणणे आहे.
नेमके काय घडले-
विजय मल्ल्यांच्या तक्रारी नुसार, युवराज सिंगवरील बोली १० कोटींपर्यंत शेवटची बोली पोहोचली होती आणि बंगळुरू संघात युवराज सामील झाल्याचे जाहीरही केले होते. परंतु, कोलकाता नाईट रायडर्स संघाने १० कोटींच्या वरील बोलीसाठी आम्ही हात वर केला होता पण, लिलाव व्यवस्थापकाचे आमच्याकडे लक्ष नव्हते अशी तक्रार केली आणि त्यानंतर पुन्हा त्यावरील बोलीला सुरुवात झाली आणि १३.५ कोटींपर्यंत दोन्ही संघांमध्ये बोली पोहोचली. अखेर कोलकाता संघाने माघार घेतली आणि विजय मल्ल्यांनी १४ कोटींमध्ये युवराजला बंगळुरू संघात सामील करून घेतले.
यासर्व प्रकारावर विजय मल्ल्या नाराज असून त्यांनी याबद्दलची अधिकृतरित्या आयपीएल व्यवस्थापनाकडे तक्रार केली असल्याचे मल्ल्या म्हणाले. पण, त्यानंतर विराट आमचा कर्णधार असून त्याच्या इच्छेवर आम्हीही पाठिंबा दर्शविला आणि चार कोटी जास्त देण्याचे दुर्देव्य घडले. असेही विजय मल्ल्या म्हणाले आहेत.