IPL 2019 च्या बाराव्या पर्वासाठी मंगळवारी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावामध्ये अनेक नवीन खेळाडूंनी कोटी कोटीची उड्डाणे घेतली आहेत. तर काही बड्या खेळाडूंना चांगलाच आर्थिक फटका बसल्याचे चित्र दिसले. रणजी, तामिळनाडू प्रीमियर लीग, भारताचा १७ आणि १९ वर्षाखालील संघात चमकदार कामगिरी करणाऱ्यांसाठी संघमालकांनी चांगली किंमत मोजल्याचे दिसले. पण भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० आणि एकदिवसीय संघात खेळलेल्या मनोज तिवारीला मात्र कोणीही विकत घेतले नाही. त्यामुळे मनोजने एक उद्विग्न पोस्ट टाकली आहे.

IPL Auction 2019 मध्ये माझ्यावर बोली लागली नाही. असे का झाले काही कळत नाही. टीम इंडियाकडून खेळताना मी शतक ठोकले आणि सामनावीराचा किताब पटकावला. त्यानंतरदेखील सलग १४ सामन्यांमध्ये मला संघातून वगळण्यात आले. २०१७च्या IPL मध्ये मला पारितोषिके मिळाली आहेत. असे असूनही माझं नक्की काय चुकलं काही कळत नाही, असे मनोज तिवारीने ट्विट केले आहे.

 

या ट्विट बरोबरच त्याने टीम इंडियाकडून शतक केले तेव्हाचा फोटो, २०१७ च्या IPL मध्ये मिळालेल्या पारितोषिकांचा फोटो आणि IPL २०१७ मधील त्याच्या कामगिरीचा फोटोदेखील पोस्ट केला आहे. मनोज तिवारीचे नाव पहिल्याच सत्रात लिलावासाठी घेण्यात आले होते. पण त्याला विकत घेण्यात कोणीही रस दाखवला नाही. त्यानंतर शेवटच्या राउंडमध्ये पुन्हा तो लिलावासाठी उपलब्ध राहिला, पण तो शेवटपर्यंत UNSOLD च राहिला.