आयपीएलच्या बाराव्या हंगामातील सामन्यांनी आता जोर धरायला सुरुवात केली आहे. दर दिवशी रंगणाऱ्या या सामन्यांमध्ये नवीन रंगत पहायला मिळते आहे. शेवटच्या चेंडूंपर्यंत रंगणाऱ्या सामन्यांमध्ये कित्येकदा रात्रीचे 12 वाजून जातात. चाहत्यांसाठी हे सामने पर्वणी असले, तरीही खेळाडूंनी याबद्दल आता चिंता व्यक्त करायला सुरुवात केली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू कुलदीप यादवने, आयपीएलमध्ये उशीरापर्यंत चालणारे सामने हे त्रासदायक असल्याचं म्हटलं आहे. तो IANS वृत्तसंस्थेशी बोलत होता.

अवश्य वाचा – IPL 2019 : ५ वर्षांची प्रतीक्षा, पहिल्याच चेंडूवर षटकार ! सिद्धेश लाडनं जिंकली मनं

“रात्री उशीरापर्यंत चालणारे सामने हे त्रासदायक होतात. कधीकधी तुम्हाला 3 दिवसांत 2 सामने खेळायचे असतात अशावेळी तुम्हाला विश्रांती घेऊन लगेच पुढच्या सामन्यासाठी तयार व्हायचं असतं. त्यात एक सामना घरच्या मैदानावर असेल, तर दुसऱ्या सामन्यासाठी इतर शहरात जावं लागतं. यामध्ये प्रवास आला, त्यामुळे एका क्षणानंतर तुमचं शरीर थकून जातं. अशावेळी तुम्हाला स्वतःची तब्येत कायम राखण्याचं मोठं आव्हान असतं. तुमच्या खाण्या-पिण्याच्या वेळा, तुमची झोप व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आयपीएलनंतर लगेचच विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे, अशावेळी सामन्यांचं आयोजन अधिक काटेकोर पद्धतीने व्हायला हवं.” कुलदीप यादवने आपली बाजू मांडली.

आयपीएलच्या बाराव्या हंगामाला सुरुवात होण्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, खेळाडूंवर अतिक्रिकेटमुळे येणाऱ्या ताणाबद्दल भीती व्यक्त केली होती. ज्या क्षणी आपल्याला थकवा वाटेल त्यावेळी आपण विश्रांतीविषयी संघमालकांशी बोलावं असा पर्याय विराटने आपल्या संघसहकाऱ्यांना दिला होता. त्यातच काही दिवसांपूर्वी समालोचक आणि माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनीही आयपीएलमध्ये उशीरापर्यंत चालणाऱ्या सामन्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये या परिस्थितीत काही बदल होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.