आयपीएलच्या सातव्या मोसमासाठीच्या लिलावात दुसऱया दिवशी नव्या दमाच्या खेळाडूंवरही कोट्यावधींची बोली लागली. यात ऋषी धवनवर किंग्ज इलेव्हन पंजाबने ३ कोटींची बोली लावली तर, मराठमोळ्या केदार जाधववर सनरायजर्स हैदराबादने २ कोटींची बोली लावत संघात सामील करून घेतले आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या करण शर्मावरही तब्बल ३.७५ कोटींची बोली सनरायजर्स हैदराबादने लावली.
ऋषी धवनवरील बोलीने रोमांचक रुप धारण केले होते. ऋषी धवनची मूळ किंमत ५० लाख ठेवण्यात आली होती. त्यावर किंग्ज इलेव्हन आणि मुंबई इलेव्हन संघाने बोली लावत ३ कोटींपर्यंत मजल मारली आणि अखेर किंग्ज इलेव्हन संघाने ऋषी धवनला संघात सामील करून घेतले. मुंबई इंडियन्सने यष्टीरक्षक आदित्य तरेसाठी १.६ कोटी रूपये मोजले अशाप्रकारे आयपीएलचा दुसरा दिवस या युवा खेळाडूंसाठी कोट्याधीश ठरवणारा ठरला तर, काहींची संघात सामील करून न घेतल्याने निराशाही झाली.