खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या हरभजन सिंगसाठी भारतीय संघाचे दरवाजे अद्याप पूर्णपणे बंद झाले नसल्याचे इराणी चषकाच्या लढतीसाठी जाहीर झालेल्या शेष भारत संघाच्या निवडीवरुन स्पष्ट झाले आहे. रणजी करंडक स्पर्धेत पंजाबचे नेतृत्त्वासह चांगली कामगिरी करणाऱ्या हरभजन सिंगकडे शेष भारताचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. हरभजनच्या बरोबरीने गौतम गंभीरलाही आणखी एक संधी देण्यात आली आहे.
रणजी विजेता कर्नाटकचा संघ आणि शेष भारत यांच्यातील इराणी चषकाची लढत ९ फेब्रुवारीपासून बंगळुरू येथे होणार आहे.
रणजी हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या केदार जाधव आणि अंकित बावणे या महाराष्ट्राच्या खेळाडूंचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. हरभजन सिंग, युवराज सिंग, गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग हे अनुभवी खेळाडू भारतीय संघात परतण्यासाठी प्रयत्नशील आहेत. इराणी चषकाच्या निमित्ताने हरभजन आणि गंभीर यांना कर्तृत्त्व सिद्ध करण्याची संधी निवडसमितीने दिली आहे. मात्र त्याचवेळी युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांना मात्र संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर संघाला पहिल्यांदाच रणजी हंगामात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारून देण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या अष्टपैलू परवेझ रसूलची या संघात निवड करण्यात आली आहे. रणजी हंगामात खोऱ्याने धावा करणाऱ्यांपैकी पंजाबचा सलामीवीर जीवनज्योत सिंग, १९ वर्षांखालील संघाचा भाग असलेला बाबा अपराजित, पंजाबचाच धडाकेबाज फलंदाज मनदीप सिंग तसेच ओडिशाचा नटराज बेहेरा यांना संघात स्थान मिळाले आहे.
हरभजन सिंग, परवेझ रसूल आणि अमित मिश्रा यांच्याकडे फिरकी आक्रमणाची धुरा असणार आहे. दरम्यान रणजी हंगामात सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या रिशी धवनला मात्र या संघात स्थान मिळालेले नाही. सातत्याने चांगली कामगिरी नोंदवणाऱ्या राजस्थानच्या पंकज सिंगला संघात सामावून घेण्यात आले आहे. दुखापतीतून सावरत प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन करणाऱ्या वरून आरोनला समाविष्ट करत निवड समिती तो पाचदिवसीय खेळासाठी तंदुरुस्त आहे, का याची चाचपणी करत आहे. बंगालचा अशोक दिंडा आणि अनुरीत सिंग यांच्यावर वेगवान गोलंदाजीची भिस्त असणार आहे. ४० वेळा रणजी जेतेपद नावावर असतानाही यंदा उपांत्यपूर्व फेरीतच आव्हान संपुष्टात आलेल्या मुंबईच्या संघातील एकाही खेळाडूला शेष भारत संघात स्थान मिळवता आलेले नाही. यावरूनच मुंबईच्या खेळाडूंच्या कामगिरीतील घसरण स्पष्ट झाली आहे.

शेष भारत संघ
हरभजन सिंग (कर्णधार), जीवनज्योत सिंग, गौतम गंभीर, बाबा अपराजित, केदार जाधव, अंकित बावणे, दिनेश कार्तिक, अमित मिश्रा, पंकज सिंग, अशोक दिंडा, वरुण आरोन, परवेझ रसूल, अनुरीत सिंग, नटराज बेहेरा, मनदीप सिंग.