आठवडय़ाची मुलाखत : विल्यम पोर्टरफिल्ड, आर्यलडचा क्रिकेटपटू

ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : आर्यलडकडे ट्वेन्टी-२० क्रिकेटला साजेशा खेळाडूंचा भरणा असून त्यांना इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) स्वत:ला सिद्ध करण्याची संधी द्यावी, अशी आशा आर्यलडचा डावखुरा अनुभवी फलंदाज विल्यम पोर्टरफिल्डने व्यक्त केली.

करोनाच्या साथीमुळे एकीकडे भारत, ऑस्ट्रेलियासह अन्य नामांकित देशांत क्रीडाविश्व ठप्प असताना आर्यलडने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेद्वारे मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या पुनरागमनात मोलाचे योगदान दिले. ‘सोनी सिक्स’ क्रीडा वाहिनीवर थेट प्रक्षेपित होणाऱ्या या मालिकेच्या पार्श्वभूमीवर एकंदर आर्यलड क्रिकेट संघाची वाटचाल आणि करोनानंतरच्या काळातील बदलत्या क्रिकेटविषयी आर्यलडचा आजपर्यंतचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोर्टरफिल्डशी केलेली ही खास बातचीत-

* करोनामुळे आर्यलड क्रिकेटचे किती नुकसान झाले?

निश्चितपणे करोनाचा अन्य देशांप्रमाणेच आर्यलडलाही हादरा बसला आहे; परंतु येथील परिस्थिती आता नियंत्रणात येत असल्याने हळूहळू सर्व काही पूर्वीप्रमाणे सुरू झाले आहे. आर्यलडच्या क्रिकेटला एकंदर किती आर्थिक नुकसान झाले, हे मला सांगता येणार नाही. मात्र गेले चार महिने येथील सर्वच क्रीडा स्पर्धा बंद होत्या. काही क्रीडापटूंवर आर्थिकदृष्टय़ा अत्यंत वाईट परिस्थिती आली, तर काहींनी जवळच्या माणसांना गमावले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा प्रारंभ केला आहे. त्यामुळे ही मालिका आमच्यासाठी अनेक कारणांनी महत्त्वाची आहे.

* करोनानंतरच्या काळातील क्रिकेटच्या नव्या स्वरूपाविषयी तुला काय वाटते?

‘आयसीसी’ने खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत घेतलेले सर्व निर्णय योग्य आहेत, असे मला वाटते. कसोटी सामन्यांत गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील; परंतु करोनाची साथ संपूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर पुन्हा एकदा खेळाडूंना लाळेचा वापर करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे. आर्यलडमध्ये क्रिकेटचे ठरावीक चाहते आहेत. त्यांना मात्र आता स्टेडियममधून खेळाचा आनंद लुटता येणार नाही, याचीच खंत वाटते.

* ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द झाल्याने ‘आयपीएल’च्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे; परंतु आर्यलडचे क्रिकेटपटू ‘आयपीएल’च्या संघमालकांचे लक्ष वेधण्यात अपयशी ठरत आहेत, असे वाटते का?

आर्यलडकडेही ट्वेन्टी-२० क्रिकेटला आवश्यक असलेल्या शैलीनुसार फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे खेळाडू आहेत. पॉल स्टर्लिग, केव्हिन ओब्राएन यांनी गेल्या वर्षी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली; परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रमवारीतील वरच्या क्रमांकाच्या संघांविरुद्ध आमचे सामने न झाल्यामुळे कदाचित त्यांच्या कामगिरीची फारशी दखल घेतली गेली नाही. त्याचप्रमाणे भारतातील खेळपट्टय़ांवर आम्हाला फिरकीपटूंविरुद्ध खेळण्याचा फारसा अनुभव नाही; परंतु आर्यलडच्या क्रिकेटपटूंना योग्य संधी दिल्यास ते नक्कीच ‘आयपीएल’मध्येही छाप पाडतील.

* विश्वचषक २०२३च्या अव्वल साखळी पात्रता फेरीबाबत तुझे काय मत आहे?

‘आयसीसी’ने जागतिक क्रमवारीतील खालच्या क्रमांकांवरील संघांना समान संधी दिल्यामुळे मी आनंदित आहे. अव्वल साखळी फेरीच्या अखेरीस यजमान भारताव्यतिरिक्त क्रमवारीत अव्वल सातमध्ये समावेश असलेल्या संघांना विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्याची संधी आहे. त्यामुळे आमच्या संघाचे क्रमवारीत अव्वल सात संघांत स्थान मिळवण्याचे प्रथम लक्ष्य आहे. प्रत्येक संघाला मायभूमीत आणि विदेशात प्रत्येकी चार मालिका खेळायच्या आहेत. मायदेशातील मालिकांचा लाभ उचलण्याकडे आमचा कल असेल. २०१९च्या विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची आमची संधी हुकली; परंतु २०२३ मध्ये आम्ही निश्चितच विश्वचषक खेळू.

* आधुनिक क्रिकेटमध्ये कोणता संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत तुला समतोल वाटतो?

माझ्या मते जो संघ अथवा खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये छाप पाडतो, तो निश्चितपणे सर्व प्रकारांत वर्चस्व गाजवू शकतो. सध्याचा भारतीय संघ निश्चितपणे सर्वोत्तम आहे. कसोटी आणि एकदिवसीय प्रकारांत भारताची गेल्या दोन वर्षांतील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे; परंतु ट्वेन्टी-२० क्रि के टमध्ये त्यांना सुधारणेला वाव आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघही भारताप्रमाणेच किमान दोन प्रकारांत चमकदार खेळ करतात. आधुनिक काळातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून मी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला पसंती देईन, तर सर्वोत्तम गोलंदाज म्हणून भारताचा जसप्रीत बुमरा आणि न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट या दोघांनाही माझे मत जाईल.

* कसोटी सामने पाचऐवजी चार दिवसांचे खेळवावेत, असे वाटते का?

खरे तर मी दोन्ही पर्यायांशी सहमत आहे. बदलत्या काळानुसार क्रिकेट अधिक वेगवान झाले आहे. त्यामुळे चार दिवसांचे सामनेही रंगतदार होऊ शकतात. कदाचित आगामी भारत-ऑस्ट्रेलिया अथवा इंग्लंड-ऑस्ट्रेलियातील अ‍ॅशेस मालिकेत चार दिवसांची एखादी कसोटी खेळवण्याचा प्रयोग करता येऊ शकतो. फक्त पाऊस अथवा अंधूक प्रकाशामुळे खेळाचा खोळंबा होता कामा नये, याकडे लक्ष द्यावे लागेल. अन्यथा पाच दिवसांच्या कसोटीचा पर्यायच कायम ठेवावा.