भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारपासून सुरू झाला. दिवस-रात्र पद्धतीचा असलेला हा सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात येत आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळला जात आहे. या सामन्याला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उपस्थितीत असल्याने हा सामना खास ठरला. याचसोबत भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्यासाठीही हा सामना विशेष ठरला.

इशांत शर्माचा हा १००वा कसोटी सामना आहे. हा टप्पा गाठणारा इशांत हा केवळ दुसरा वेगवान भारतीय गोलंदाज आहे. या आधी माजी कर्णधार कपिल देवने हा टप्पा ओलांडला होता. इशांतने २००७ साली बांगलादेशविरूद्ध कसोटी पदार्पण केलं. इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत इशांतने ३०० गड्यांचा टप्पादेखील पूर्ण केला. मात्र आज तो १००वी कसोटी खेळण्यासाठी उतरला. त्यातही त्याचा राष्ट्रपती कोविंद आणि अमित शाह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने संघात चार बदल केले. जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो आणि जॅक क्रॉली या चौघांना संघात स्थान देण्यात आले. तर जो बर्न्स, लॉरेन्स, स्टोन आणि मोईन अली यांना संघातून वगळण्यात आले. भारतानेही संघात दोन बदल केले. सिराजच्या जागी बुमराहला संघात स्थान मिळाले. तसेच कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदर संघात आला.