इंडियन सुपर लीगने (आयएसएल)भारतीय फुटबॉलला एक वेगळी उंची मिळवून दिली. आज आम्ही घराघरांत पोहोचलो आहोत, ते केवळ आयएसएलमुळे. राष्ट्रीय संघाचा भाग असलो तरी माझी ओळख मर्यादित होती. आयएसएलने ती मर्यादा ओलांडून भारतीय खेळडूंना स्वत:ची ओळख निर्माण करण्याचे व्यासपीठ दिले, असे मत अ‍ॅटलेटिको दी कोलकाता संघाचा बचावपटू रिनो अँटोने व्यक्त केले.

गतविजेत्या कोलकाताने पहिल्याच लढतीत यजमान चेन्नईयन एफसीचा ३-२ असा पराभव करून आयएसएलच्या दुसऱ्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली.  पहिल्याच आयएसएल लढतीत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलणारा रिनो फुटबॉल विश्वचषक पात्रता फेरीच्या लढतीसाठी राष्ट्रीय कर्तव्यासाठी तुर्कमेनिस्तानला रवाना झाला आहे. भारत ८ तारखेला यमजानांविरुद्ध, तर १३ ऑक्टोबरला ओमानविरुद्ध खेळणार आहे.

आयएसएलच्या पहिल्या लढतीतील अनुभवाविषयी तो म्हणाला, ‘‘अभूतपूर्व, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या विदेशी खेळाडूंसोबत खेळण्याचा आनंद शब्दांत सांगणे कठीण आहे. पण, हा अनुभव भविष्यातील वाटचालीसाठी फार महत्त्वाचा आहे. केवळ माझ्यासाठीच नव्हे तर प्रत्येक भारतीय खेळाडूसाठी जो या स्पध्रेत खेळतोय त्याच्यासाठी हे एक महाविद्यालय आहे. विदेशी खेळाडूंची चेंडू पास करण्याचे कौशल्य, एकमेकांमधला ताळमेळ आदी पलू त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहेत. राष्ट्रीय संघात याचा नक्की फायदा होईल.’’