रवी कुमारला कांस्यपदक

भारताच्या मनू भाकेरने विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णभेद करीत सर्वाचे लक्ष वेधून घेतले. भारताच्या रवी कुमारने कांस्यपदक जिंकले.

मेक्सिकोत सुरू असलेल्या या स्पर्धेतील १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनूने विश्वचषक अंतिम फेरीची विजेती अ‍ॅलेझांड्रा जेव्हेला हिला पराभूत केले. तिने २३७.५ गुणांची कमाई केली. अ‍ॅलेझांड्राने २३७.१ गुणांसह रौप्यपदक पटकावले. फ्रान्सच्या सेलिना गोबरव्हिलेला कांस्यपदक मिळाले. तिने २१७ गुणांची नोंद केली. १९६.१ गुण नोंदवणाऱ्या भारताच्या यशस्विनी सिंगला चौथे स्थान मिळाले. अकरावीमध्ये शिकणाऱ्या मनूने यंदा ब्यूनस आयर्स येथे होणाऱ्या युवा ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला आहे.

रवी कुमारने  पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक मिळवताना २२६.४ गुणांची नोंद केली. दीपक कुमारला चौथा क्रमांक मिळाला. रवीने गतवर्षी विश्वचषक स्पर्धाच्या मालिकेतील तीन स्पर्धामध्ये अंतिम फेरी गाठली होती, मात्र त्यामध्ये त्याला पदक मिळवता आले नव्हते. हंगेरीच्या इस्तवान पेनीने २४९.५ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्झांडर श्मिरीने २४८.७ गुणांसह रुपेरी कामगिरी केली.

माझी ही पहिलीच विश्वचषक स्पर्धा असल्यामुळे हे सुवर्णपदक माझ्यासाठी संस्मरणीय आहे. या स्पर्धेतील सुवर्णपदकाचा फायदा घेत आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये अव्वल कामगिरी करू शकेन, असा मला आत्मविश्वास वाटत आहे.

मनू भाकेर