दिल्लीकरांनी ट्रक शर्यतींचा थरार अनुभवला
मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांकडेही शर्यतींचे कौशल्य असते याचाच प्रत्यय येथे आयोजित करण्यात आलेल्या टाटा प्राईमा ट्रक शर्यतींमध्ये पाहावयास मिळाला. दिल्लीकरांना या शर्यतींद्वारे अनोख्या शर्यतींचा थरार अनुभवता आला. भारतीय स्पर्धकांमध्ये जगतसिंग व ए. नागार्जुना विजेते ठरले.
ग्रेटर नोएडा येथील आंतरराष्ट्रीय रेसिंग ट्रॅकवर आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतींमधील ब्रिटिश चालकांच्या विभागात मॅट समरफिल्ड व डेव्हिड जेनकिन्स यांना विजेतेपद मिळाले. या शर्यतीचे हे तिसरे वर्ष होते व प्रथमच यंदा भारतीय चालकांसाठी स्वतंत्र विभाग ठेवण्यात आला होता. त्यामुळे भारतीय व ब्रिटिश या दोन्ही चालकांची वाहनशैली पाहण्याचा आनंद वीस हजार प्रेक्षकांनी घेतला.
भारतीय विभागात बारा स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. या स्पर्धकांची दोन गटांत विभागणी करण्यात आली होती. पहिल्या विभागात हरयाणाचा जगतसिंग याने विजेतेपद पटकाविले. आठ फेऱ्यांच्या या शर्यतीत त्याने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती व शेवटपर्यंत ती टिकविली. ट्रॅकवरील वळणांवर वेग वाढविताना त्याने सुरेख कौशल्य दाखविले. तीन किलोमीटर अंतराच्या ट्रॅकला आठ फेऱ्यांची ही शर्यत होती. त्यामध्ये त्याने सर्वोत्तम एक मिनिट ५४.३५ सेकंद वेळ नोंदविली. त्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. मलकितसिंग व राजकुमार महातो यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान घेतले.
बक्षिसातून मुलांचे शिक्षण करणार : जगतसिंग
शर्यत जिंकण्याचा मला आत्मविश्वास होता. सराव शिबिरात माझी चांगली तयारी झाली होती. विजेतेपदाद्वारे मिळणाऱ्या रकमेचा विनियोग मुलांच्या उच्चशिक्षणाकरिता करणार आहे असे सांगून जगतसिंग म्हणाला, या विजेतेपदामुळे मला आपण सेलेब्रिटी झाल्याचेच वाटत आहे. प्रथमच एखाद्याला मी माइकद्वारे मुलाखत देत आहे. एक वेळ शर्यत करणे सोपे आहे, मात्र पत्रकारांना सामोरे जाणे खूप अवघड आहे.
भारतीय स्पर्धकांच्या दुसऱ्या विभागात आंध्र प्रदेशच्या ए. नागार्जुना याने विजेतेपद पटकाविले. आठ फेऱ्यांच्या शर्यतीत त्याने पहिल्या फेरीत आघाडी मिळविली होती. तेथून त्याने सातत्य दाखविले. त्याने एक फेरी एक मिनिट ५२ सेकंदात पार केले. भाग चंद व आनंदकुमार यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला.
िजकण्याची खात्री होती : नागार्जुना
शर्यतीसाठी खूप मनापासून सराव केला होता त्यामुळे अंतिम फेरी जिंकण्याची मला खात्री होती. या विजेतेपदामुळे माझी आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. परदेशी चालकांसमवेत शर्यत करण्याची माझी इच्छा आहे. पुढच्या वर्षी जर संधी मिळाली तर निश्चितपणे ब्रिटिश चालकांच्या विभागात भाग घेईन, असे नागार्जुना याने सांगितले.
ब्रिटिश चालकांच्या पहिल्या शर्यतीत मॅट समरफिल्ड याने बारा फेऱ्यांमधील दुसऱ्या फेरीत आघाडी घेतली व अखेपर्यंत त्याने अव्वल स्थान टिकविले. ग्रॅहॅम पॉवेल व रिक कॉलेटे यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळविले. ब्रिटिश स्पर्धकांसाठी पुन्हा वीस फेऱ्यांची शर्यत घेण्यात आली. पहिल्या शर्यतीत चौथा क्रमांक घेणाऱ्या डेव्हिड जेनकिन्स याने दुसऱ्या शर्यतीत बाजी मारली. रिक याने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली तर पॉवेलने तिसरा क्रमांक मिळवला.
विजेता जगत सिंग मुलीसमवेत

– मिलिंद ढमढेरे