भारताच्या अजय जयरामने विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेच्या पहिल्याच दिवशी कमाल केली. त्याने हाँगकाँगच्या १२व्या मानांकित विंग कि वोंगवर सनसनाटी विजय मिळवित शानदार सलामी नोंदवली. याचप्रमाणे जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या पारुपल्ली कश्यपने आपल्या दर्जाला साजेसा खेळ दाखवत पहिला विजय नोंदवला. मात्र अश्विनी पोनप्पाचे स्पध्रेच्या दोन्ही गटांमधील आव्हान संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानावर असलेल्या भारताच्या २५ वर्षीय जयरामने पुरुषांच्या एकेरीत कि वोंगविरुद्ध झालेला सामना २२-२०, १७-२१, २१-१५ असा जिंकला. शेवटपर्यंत रंगतदार झालेल्या या लढतीत दोन्ही खेळाडूंनी स्मॅशिंग व प्लेसिंगचा बहारदार खेळ केला. निर्णायक क्षणी जयरामने परतीचे फटके व ड्रॉप शॉट्सवर चांगले नियंत्रण ठेवत विजयश्री खेचून आणली.
या स्पध्रेसाठी १३वे मानांकन लाभलेल्या पी. कश्यपने इस्टोनियाच्या रौल मस्टवर १९-२१, २१-१४, २१-९ अशी मात करत विजयी सलामी दिली. रौलने पहिला गेम जिंकत जबरदस्त सुरुवात केली. मात्र कश्यपने पुढचे दोन्ही गेम सहजतेने जिंकत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली.
ज्वाला गट्टाच्या साथीने यापूर्वी महिलांच्या दुहेरीत कांस्यपदक मिळविणाऱ्या अश्विनी पोनप्पाने प्रज्ञा गद्रेसोबत या स्पध्रेत भाग घेतला. परंतु या जोडीला रोमहर्षक लढतीनंतर लिने क्रुझ व मेरी रोईपेके या डेन्मार्कच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. हा सामना क्रुझ व मेरी यांनी २१-२३, २१-१८, २१-१७ असा जिंकला. पहिला गेम घेतल्यानंतर भारतीय जोडीचा अपेक्षेइतका खेळ बहरला नाही.
अश्विनीला मिश्र दुहेरीतही पराभवाला सामोरे जावे लागले. अश्विनी व तरुण कोना यांना जपानच्या हाशिमोतो हिरोकात्सू व मियुकी माएदा यांनी २१-१८, १२-२१, २१-१९ असे हरविले.  मिश्र दुहेरीतील आणखी एका लढतीत अपर्णा बालन व तिचा सहकारी अरुण विष्णू यांचेही आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. मिन चुनलिओ व हेसिओ हुआनचेन (चीन तैपेई) यांनी त्यांच्यावर २१-१६, २१-१६ अशी सरळ दोन गेम्समध्ये मात केली.  महिलांच्या दुहेरीत अपर्णा व एन.सिक्की रेड्डी यांनाही पहिल्या फेरीतच हार स्वीकारावी लागली. लॉरेन स्मिथ व गॅब्रिएल व्हाइट (इंग्लंड) यांनी भारतीय जोडीचा २१-१५, २१-१७ असा पराभव केला.