व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची घोडदौड

हो चि मिन्ह : भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयराम, रितुपर्णा दास आणि मिथुन मंजुनाथ या तिघांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मात करत व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

जयराम सध्या पूर्ण बहरात खेळत असून जागतिक क्रमवारीतदेखील त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम १३व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. या स्पर्धेतही त्याने लय कायम राखली असून बुधवारी त्याने ब्राझीलच्या यगोर कोएल्होला २२-२०, २१-१४ असे अवघ्या ३४ मिनिटांत पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. गेल्या महिन्यात जयरामने व्हाइट नाइट स्पर्धेचे उपविजेतेपद तर तीन वर्षांपूर्वी कोरिया खुल्या स्पर्धेचेदेखील उपविजेतेपद पटकावले होते. त्याचा पुढील सामना कॅनडाच्या झिआओडोंग शेंगशी होणार आहे. दुसरीकडे युवा मिथुन मंजुनाथने थायलंडच्या अ‍ॅडलराच नामकुलला १८-२१, २१-१३, २१-१९ असे पराभूत केले. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यानंतरदेखील त्याने हा विजय साकारत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्याचा पुढील सामना चीनचा झोऊ झेकी याच्याशी होणार आहे. महिलांमध्ये भारताच्या रितुपर्णा दासने चिनी तैपेईच्या सुंग शुओ युनचा २१-८, २१-१४ असा पराभव केला. तिची उपांत्यपूर्व फेरीची लढत थायलंडच्या फिट्टायापोन चायवानशी होणार आहे.