जो रुटच्या मॅरेथॉन द्विशतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ८ बाद ५८९ धावांवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानची ४ बाद ५७ धावा अशी घसरगुंडी उडाली.

४ बाद ३१४ वरून पुढे खेळणाऱ्या इंग्लंडच्या डावाला रूटनेच आकार दिला. यासिर शाहच्या गोलंदाजीवर चौकार लगावत रुटने द्विशतक पूर्ण केले. यासिरच्याच गोलंदाजीवर दुहेरी धाव घेत रुटने २५० धावांची मजल मारली. वहाब रियाझने त्याची खेळी संपुष्टात आणली. रुटने २७ चौकारांच्या साथीने २५४ धावांची खेळी साकारली. रुटने वोक्ससह सहाव्या विकेटसाठी १०३ तर जॉनी बेअरस्टोच्या साथीने सातव्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. ख्रिस वोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी प्रत्येकी ५८ धावा करत रूटला चांगली साथ दिली. पाकिस्ताननतर्फे वहाब रियाझने ३ बळी घेतले.

मोठय़ा धावसंख्येच्या दडपणासमोर  पाकिस्तानने मोहम्मद हफीझ (१८), अझर अली (१), युनिस खान  (१) व राहत अली (४)  यांना गमावले. शान मसूद ३० धावांवर खेळत आहे. पाकिस्तानचा संघ अजूनही ५३२ धावांनी पिछाडीवर आहे.