IPL 2019 RR vs KXIP : यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना जिंकून पंजाब संघाने विजयी सुरूवात केली आहे. मात्र, बटलरला ज्या पद्धतीने बाद केले त्यानंतर अश्विन दिग्गजांच्या टिकेचा धनी बनला आहे. बटलरला बाद झाल्यानंतर अश्विनच्या अखिलाडूवृत्तीवर अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजबाने ख्रिस गेलच्या ७९ धावा आणि सर्फराज अहमदची नाबाद ४६ धावांची खेळी याच्या जोरावर पंजाबने २० षटकात ४ बाद १८४ धावा केल्या आणि राजस्थानपुढे विजयासाठी १८५ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर जोस बटलर याने शानदार अर्धशतक केले. पण तो ४३ चेंडूत ६९ धावांवर असताना त्याला अजब पद्धतीने बाद करण्यात आले.

पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन याने अर्धशतकवीर जोस बटलरला अजब पद्धतीने धावबाद केले. गोलंदाजीत चेंडू टाकण्याआधी त्याने नॉन-स्ट्राईककडील यष्ट्यांच्या वरील बेल्स उडवल्या. त्यावेळी बटलर धाव घेण्यासाठी क्रीजबाहेर निघाला होता. पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचाकडे सोपवला. तिसऱ्या पंचांनीही मंकड नियमाप्रमाणे बटलरला बाद ठरवले. पंचाच्या निर्णयाने बटलरने नाराजी व्यक्त केली. यावर अश्विन आणि बटलरमध्ये बाचाबाचीही झाल्याचे दिसले. सामना संपल्यानंतर दोघांनी एकमेंकांना हात मिळवल्याचेही दिसले नाही. त्यामुळे बटलर आणि अश्विनमध्ये झालेल्या कृत्यामुळे आयपीएलमधील नवा वाद समोर आला आहे.

सोशल मीडियावर अश्विनवर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाद असेल तर पंचानी बाद दिले असते. अश्निनने बटलरला इशारे करायची गरज नव्हती. अश्निनने खिलाडूवृत्तीचे दर्शन दिले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या चाहत्यांनी अश्विनवर नेटीझन्सनी टीकेची झोड उडवली आहे. जेसन रॉय, मोहम्मद कैफ, डेल स्टेन आणि आकाश चोप्रासारख्या दिग्गजांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सर्वांनी अश्विनच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली.

काय आहे मंकड नियम –
क्रिकेटच्या 41.16 नियमानुसार, नॉन-स्ट्राईकर फलंदाज गोलंदाजाने चेंडू टाकल्याशिवाय क्रिज सोडू शकत नाही. जर फलंदाजाने क्रिज सोडले आणि त्याचवेळी गोलंदाजाने चेंडू यष्ट्याला लावला तर बाद दिले जाते.