ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. शिस्तभंगाच्या कारवाईमुळे निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या कगिसो रबाडाच्या तिसऱ्या कसोटीत खेळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी झालेल्या बाचाबाचीनंतर रबाडावर सामनाधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली होती.

रबाडावर झालेल्या कारवाईनंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने शिक्षेला आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या मंडळाने दाखल केलेल्या आव्हानवर न्यूझीलंडच्या न्यायिक आयोगाचे प्रमुख मायकेल हेरॉन यांच्यापुढे टेलिकॉन्फरन्सपुढे सुनावणी करण्यात आली. या सुनावणीनंतर रबाडावरील दोन सामन्यांची बंदी मागे घेण्यात आली. तिसरा कसोटी सामना गुरुवारी सुरु होणार आहे.

एकाच सामन्यात दोन वेळा आचारसंहितेचा भंग केल्याचे आरोप रबाडावर करण्यात आला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. याबरोबरच सामन्याचे मानधन 50 टक्के कपात करण्याची रक्कमही 25 टक्के करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या प्रकरणी कगिसो रबाडा दोषी आढळलेला नाही. त्यामुळे त्याच्यावरील बंदी मागे घेण्यात येत आहे.