|| ऋषिकेश बामणे

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांत भारताच्या मधल्या फळीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. मात्र अनुभवी अष्टपैलू खेळाडू केदार जाधवचे उर्वरित दोन सामन्यांसाठी संघात पुनरागमन झाल्याने सोमवारी होणाऱ्या चौथ्या लढतीत भारताचे पारडे नक्कीच जड असेल. उपलब्ध असूनही संघात स्थान न दिल्यामुळे पहिल्या तीन सामन्यांमध्ये केदारची उणीव तीव्रतेने भासली.

पुण्यात झालेल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीव्यतिरिक्त भारताचा एकही फलंदाज लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. तसेच सहा फलंदाज व पाच गोलंदाजांसह खेळण्याचा डाव अपयशी ठरला. अशा वेळी एखादा अष्टपैलू संघात असता तर नक्कीच फरक पडला असता, अशी टीका भारतीय संघ व्यवस्थापनावर होत आहे.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत केदारने पाचव्या-सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत बहुमूल्य योगदान दिले होते. त्याशिवाय साखळी फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत मोक्याच्या क्षणी तीन बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला, तर अंतिम फेरीत बांगलादेशविरुद्ध दुखऱ्या पायाने फलंदाजी करत त्यानेच भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेतही केदारने भारत ‘अ’ संघाकडून एका सामन्यात खेळताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २५ चेंडूंत ४१ धावा फटकावून आपण तंदुरुस्त असल्याचे सिद्ध केले होते. मात्र निवड समितीच्या सदस्यांनी त्याच्या मागील दुखापतींचे कारण देऊन विंडीजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांत संघात स्थान दिले नव्हते.

अष्टपैलू केदार हाच योग्य पर्याय -वेंगसरकर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात पाच विशेषज्ञ गोलंदाज खेळवल्याने भारताला अष्टपैलू खेळाडूची तीव्रता भासली. आता उर्वरित मालिकेत अष्टपैलू केदार हाच योग्य पर्याय आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली. ‘‘भारताला तिसऱ्या सामन्यात अष्टपैलू खेळाडूची उणीव प्रकर्षांने जाणवली. त्यामुळे उर्वरित मालिकेत कर्णधार विराट कोहलीला संघाचा समतोल साधण्यासाठी केदारला खेळवावेच लागेल. केदार पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्यास सहाव्या स्थानावर महेंद्रसिंह धोनी किंवा ऋषभ पंत यांच्यापैकी एकालाच संधी देण्यात यावी,’’ असे मत वेंगसरकर यांनी मांडले आहे. ‘‘केदार हा एक उपयुक्त कामचलाऊ फिरकी गोलंदाज असून फलंदाजीत बऱ्यापैकी योगदान देऊ शकतो,’’ असेही त्यांनी सांगितले.