करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांना क्रिके टपटू के दार जाधवने मदतीचा हात दिला आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरने (एमसीसीआयए) हाती घेतलेल्या प्रकल्पाला केदारने निधी दिला आहे, अशी माहिती ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी दिली.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी एमसीसीआयएने पुढाकार घेतला आहे. त्यात उद्योग क्षेत्राकडून निधी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निधीचा वापर आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात येत आहे. या निधीतून संरक्षक पोशाख, एन ९५ मास्क, व्हेंटिलेटरचा पुरवठा रुग्णालये आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केला जात आहे. पहिल्या टप्प्यात व्हेंटिलेटर्स आणि मास्क विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

सध्याच्या संकटकाळात आपण सर्वानीच काळजी घेतली पाहिजे. सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन केले पाहिजे. सध्या मीही माझ्या कुटुंबाची काळजी घेत आहे. संचारबंदीमुळे मला कुटुंबीयांना वेळ देण्याची संधी मिळत आहे.  वैद्यकीय कर्मचारी करत असलेल्या कामासाठी त्यांना माझा सलाम. या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी ‘एमसीसीआयए’च्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी माझ्या परीने मदत केली आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीसाठीही काही मदत के ली आहे. आपण सर्वानीच आपापल्या परीने पुढे येऊन मदत करावी.

– केदार जाधव, क्रिकेटपटू