भारताच्या ३ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चार कसोटी सामन्यांसाठी ठिकाणे निश्चित करण्यात आली असली तरी करोनामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता एकाच मैदानावर सर्व सामने खेळवण्याचा पर्याय अखेरीस स्वीकारावा लागू शकतो, असे मत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे कसोटी सामने होणार आहेत. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा मात्र ३ डिसेंबरपासून निश्चितपणे सुरू होईल, असा विश्वास रॉबर्ट्स यांना आहे.

‘‘चार कसोटी सामन्यांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी देशांतर्गत शहरांच्या सीमा प्रवासासाठी उपलब्ध झाल्या असतील, असे गृहीत धरण्यात आले आहे. परंतु तसे न झाल्यास एकाच स्टेडियममध्ये चारही कसोटी सामने खेळवण्याचा पर्यायच आम्हाला स्वीकारावा लागेल,’’ असे ७० वर्षीय रॉबर्ट्स म्हणाले.

‘‘भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा आखलेल्या नियोजनाप्रमाणे होईल याची खात्री आहे. भारताच्या मालिकेद्वारे ऑस्ट्रेलियामध्येही पुन्हा क्रिकेटचे वारे वाहण्यास सुरवात होईल. मात्र सामन्यांना नेहमीसारखा पाठिंबा इतक्या लगेच लाभण्याची शक्यता कमी आहे. त्याशिवाय अनेक नव्या नियमांमुळे खेळाडूंनाही स्वत:वर अधिक बंधने घालावी लागतील,’’ असेही रॉबर्ट्स यांनी सांगितले.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पश्चिम ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेचे प्रमुख ख्रिस्तिना मॅथ्यूज यांनी पर्थऐवजी ब्रिस्बेनला पहिल्या कसोटीचे यजमानपद बहाल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ‘‘भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ब्रिस्बेनला कसोटीचे आयोजन मिळाले नव्हते. याउलट पर्थला भारताविरुद्धची कसोटी आणि इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटींचे आयोजन एकूण आठ वर्षांच्या काळात मिळाले आहे. या स्थितीत यंदा ब्रिस्बेनला भारताविरुद्धच्या कसोटीचे आयोजन दिले,’’ असे रॉबर्ट्स यांनी स्पष्ट केले.

विश्वचषक लांबल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अधिक आर्थिक नुकसान!

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार की नाही याबाबतचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) १० जूनपर्यंत लांबणीवर टाकला आहे. मात्र विश्वचषक लांबणीवर टाकण्यात आला तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अधिक आर्थिक नुकसान होईल, अशी चिंता रॉबर्ट्स यांनी व्यक्त केली. ‘‘ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ट्वेन्टी-२० विश्वचषक होईल अशी अपेक्षा आहे. मात्र जरी वेळेत स्पर्धा झाली तरीदेखील आर्थिक नुकसान मोठय़ा प्रमाणात होऊ शकेल. त्याचे कारण म्हणजे जर विश्वचषक प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आला, तर तिकिटाच्या रूपाने जो महसूल मिळतो तो मिळणार नाही. जर सुरक्षित वातावरणात स्पर्धा आयोजित करायची असेल तर अनेक गोष्टींची तयारी करावी लागेल. त्यासाठीही मोठा खर्च असेल. त्यामुळे विश्वचषक वेळेत झाला किंवा लांबणीवर टाकण्यात आला तरी आमचे आर्थिक नुकसान निश्चित आहे,’’ असे रॉबर्ट्स यांनी सांगितले.