इंग्लंडमध्ये पार पडलेल्या २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. यानंतर तत्कालीन निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिली. मात्र ऋषभला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही, त्यामुळे नवीन वर्षात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघ व्यवस्थापनाने लोकेश राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. लोकेशनेही फलंदाजी आणि यष्टीरक्षण अशा दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. यानंतर काही खेळाडूंनी लोकेशला टी-२० मध्ये यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी सोपवावी अशी मागणी केली. मात्र माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफच्या मते राहुलचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून वापर व्हायला हवा.

“लोकांना असं वाटतंय की लोकेश राहुल भविष्यात मुख्य यष्टीरक्षक म्हणून काम पाहिलं. पण माझ्या मते राहुलचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून वापर व्हायला हवा. जर तुमच्या संघातला मुख्य यष्टीरक्षक दुखापतग्रस्त असेल तर राहुलला यष्टीरक्षण करु दे. जर राहुलवर आपण यष्टीरक्षणासाठी अवलंबून राहिलो तर त्याला दुखापती होण्याची शक्यता आहे आणि याचसोबत त्याच्याकडून फलंदाजीचीही अपेक्षा असल्यामुळे त्याच्यावर दबाव वाढू शकतो. यासाठी राहुलचा पर्यायी यष्टीरक्षक म्हणून वापर व्हायला हवा.” कैफ ANI वृत्तसंस्थेशी बोलत होता.

दरम्यान, २९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार होती. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार होता. परंतु करोनामुळे देशातल्या परिस्थितीत सुधारणा न झाल्यामुळे बीसीसीआयने अखेरीस स्पर्धा स्थगित केली आहे.