महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून मात केली आहे. याचसोबत भारताने तीन वन-डे सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली आहे, कसोटी मालिकेपाठोपाठ भारताने वन-डे मालिकेतही बाजी मारत ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करुन ऐतिहासिक विजय साकारला आहे. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या धोनीला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला आहे. धोनीच्या या कामगिरीमुळे सोशल नेटवर्किंगवरून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाचा एका खास प्रशंसकाने त्याच्यासाठी विजयानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच ट्विट केले आहे. ही खास व्यक्ती म्हणजे भारताची गानकोकीळा लता मंगेशकर.

लतादीदींचे क्रिकेटवरील प्रेम जगजाहीर आहे. अनेकदा त्यांनी हे स्वत: सांगितलं आहे. आजही लतादीदींनी पुन्हा एकदा आपले क्रिकेट प्रेम ट्विटरच्या माध्यमातून दाखवून दिले. भारताने ऑस्ट्रेलियामध्ये पहिलाच एकदिवसीय मालिका विजय मिळवल्यानंतर त्यांनी स्वत: गायलेल्या ‘वंदे मातरम्’ या गाण्याचा जुना व्हिडीओ पोस्ट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. या ट्विटमध्ये त्यांनी धोनीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये लतादीदी म्हणतात, ‘भारताने मालिका जिंकून ऑस्ट्रेलियात तिरंगा फडकावला आहे. मी आपल्या संपूर्ण संघाचे आणि खास करुन धोनीचे अभिनंदन करते.’

दरम्यान या सामन्यामध्ये महेंद्रसिंह धोनीने ८७ तर केदार जाधवने ६१ धावांची खेळी केली. या दोघांनीही चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसन-सिडल आणि स्टॉयनिस यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. सामन्यात ६ बळी घेणाऱ्या युझवेंद्र चहलला सामनावीर तर दोन सामन्यात भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं.