जमैकाच्या युसेन बोल्ट व शेली अ‍ॅनी फ्रेझर यांनी जागतिक मैदानी स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक जिंकून हॅट्ट्रिक पूर्ण केली.
जमैकाने पुरुषांची ४ बाय १०० मीटर रिले शर्यत ३७.३६ सेकंदांत पार केली. त्यावेळी त्यांच्या संघात नेस्टा कार्टर, केमर बॅली कोल, निकेल अ‍ॅशमेड व युसेन बोल्ट यांचा समावेश होता. बोल्टने या स्पर्धेत १०० व २०० मीटर धावण्याची शर्यतही जिंकली होती. अमेरिकेने ३७.६६ सेकंदांत ही शर्यत जिंकून रौप्यपदक मिळविले. इंग्लंडने हे अंतर ३७.८० सेकंदांत पार करीत तिसरा क्रमांक घेतला होता. मात्र त्यांच्या खेळाडूंनी नियमाचा भंग केल्यामुळे त्यांच्या संघाला बाद करण्यात आले. कॅनडाला कांस्यपदक बहाल करण्यात आले. त्यांनी हे अंतर ३७.९२ सेकंदांत पार केले.
महिलांमध्ये फ्रेझरने १०० व २०० मीटर शर्यतीपाठोपाठ संघाला रिले शर्यतीचेही विजेतेपद मिळवून दिले. कॅरी रसेल, कॅरेन स्टुअर्ट, शिलोनी कॅलव्हर्ट व शैली फ्रेझर यांचा समावेश असलेल्या जमैकाच्या संघाने ४ बाय १०० मीटर रिले शर्यत ४१.२९ सेकंदात जिंकली. फ्रान्स (४२.७३ सेकंद) व अमेरिका (४२.७५ सेकंद) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत केनियाच्या ईम्युनीस जेपकोच सुमने सुवर्णपदक मिळविले. तिने ही शर्यत एक मिनिट ५७.३८ सेकंदांत पार केली. रशियाच्या मारिया सॅव्हिनोवा व अमेरिकेची ब्रँन्डा मार्टिनेझ यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकाविले.
पुरुषांची १५०० मीटर अंतराची शर्यत केनियाच्या अ‍ॅसबेई किपरोप याने तीन मिनिटे ३६.२८ सेकंदात जिंकली. मॅथ्यू सेंट्रोविट्झ (अमेरिका) व जोहान क्रोनिए (दक्षिण आफ्रिका) हे अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाचे मानकरी ठरले.