अहंकार हा माणसाचा मुख्य शत्रू. या शत्रूवर मात केली तरच खऱ्या अर्थाने तुमचा नावलौकिक सिद्ध होतो. दुर्दैवाने भारताच्या क्रीडा क्षेत्रात खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा त्यांच्या अहंकारामुळे घडणाऱ्या नाटय़ाला जास्त प्रसिद्धी मिळते व पर्यायाने या खेळाडूंबरोबरच तो खेळही बदनाम होतो. भारतीय डेव्हिस चषक संघाचा न खेळणारा कर्णधार महेश भूपती व संघाचा आधारस्तंभ राहिलेला लिएण्डर पेस यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आल्यानंतर या खेळाडूंबरोबरच भारतीय टेनिसचीही भरपूर बदनामी झाली.

भारताने नुकत्याच झालेल्या डेव्हिस लढतीत उझबेकिस्तानला ४-१ असे हरवले. या लढतीपासून भारतीय संघाची धुरा भूपती याच्याकडे आली. तेव्हाच पेसला संघात स्थान मिळणार नाही, हे उघड झाले होते. एकेकाळी पेस-भूपती ही जोडी जागतिक टेनिस क्षेत्रात ‘इंडियन एक्स्प्रेस’ नावाने ओळखली जात होती. या जोडीने ग्रँड स्लॅम स्पर्धासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये दुहेरीत अजिंक्यपदे मिळवली होती. एवढेच नव्हे, तर जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरही त्यांनी आपली मोहोर नोंदवली होती.

त्यांच्या या कामगिरीमुळे देशातील टेनिस क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली होती. भारतीय संघातील खेळाडूंची निवड हा गेल्या काही वर्षांमध्ये वादाचाच विषय ठरला आहे. त्यातही पेसला संघात स्थान देण्यावरून नेहमीच भांडणे दिसून येऊ लागली आहेत. पेसने आतापर्यंत सात वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताला ऑलिम्पिकमधील टेनिसचे एकमेव पदक त्यानेच मिळवून दिले आहे. अटलांटा येथे १९९६मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्याने कांस्यपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर टेनिसमध्ये भारताची पाटी कोरीच राहिली आहे. पेसने डेव्हिस चषक स्पर्धेत आतापर्यंत दुहेरीत ४२ सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. चाळिशी उलटल्यानंतरही तो अजून ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये पुरुष व मिश्र दुहेरीत अंतिम फेरीपर्यंत धडक मारू शकतो, एवढेच नव्हे तर तेथेही तो विजेतेपद मिळवत आहे. मात्र पेस व महेश भूपती यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर ऑलिम्पिक व डेव्हिस चषक स्पर्धेत पेसबरोबर योग्य समन्वय ठेवणारे व त्याच्याशी योग्य संवाद करू शकणारे खेळाडू भेटत नाहीत, हे भारताचे दुर्दैवच ठरले आहे. यंदाच्या मोसमात पेस व साकेत मायनेनी यांनी स्पेनविरुद्धच्या डेव्हिस लढतीत दुहेरीत जिद्दीने खेळ केला होता. अलीकडच्या काळात पेसने आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धामधील सहभाग व डेव्हिस चषकसारख्या सांघिक स्पर्धा या दोन्ही दगडांवर आपला पाय ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळा सांघिक स्पर्धाच्या सरावाला उशिरा येण्यासारखे प्रसंगही त्याच्या वाटय़ाला आले आहेत. तो कायमच देशासाठी खेळला आहे व खेळत आला आहे, यामध्ये कोणतेच किंतू नाही. तो युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहे व त्यांना तो प्रोत्साहनपर मार्गदर्शनही करीत असतो. मात्र आपल्यामुळे एखाद्या युवा किंवा नवोदित खेळाडूची जागा अडली आहे, याचे भान त्याने ठेवले पाहिजे होते. अधिकाधिक ऑलिम्पिक स्पर्धामध्ये भाग घेण्याचा किंवा डेव्हिस चषक स्पर्धेत अधिकाधिक सामने जिंकण्याचा विक्रम डोळय़ांसमोर ठेवत त्याने आपले भारतीय संघातील स्थान अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यामुळेच भारताचे अन्य खेळाडू दुखावले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेसने अव्वल कीर्ती असतानाच भारतीय संघातून निवृत्ती घेणे हे त्याच्यासाठी व देशासाठी हितकारक ठरणार आहे.

डेव्हिस लढत ही सांघिक स्वरूपाची लढत असल्यामुळे खेळाडूंचा एकत्रित सराव अतिशय महत्त्वाचा असतो. विशेषत: दुहेरीतील लढतीसाठी निवड झालेल्या खेळाडूंनी किमान सहा-सात दिवस एकत्रित सराव केला पाहिजे. संघाची निवड करताना संघातील राखीव खेळाडूही मुख्य खेळाडूंइतकेच तुल्यबळ लढत देण्याची क्षमता असलेले खेळाडू पाहिजेत. म्हणजे मुख्य फळीतील खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर ऐनवेळी त्याच्या दर्जाइतका खेळाडू कोण आणायचा याकरिता शोधाशोध व धावाधाव करावी लागत नाही. बऱ्याच वेळा असे दिसते की दुसऱ्या फळीतील खेळाडू राखीव खेळाडूची भूमिका करण्यास नाखूश असतात. त्याऐवजी ते आंतरराष्ट्रीय मानांकन गुण मिळवण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यास प्राधान्य देतात.

कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी भारतीय संघ निवडताना निवड समितीने चाचणी स्पर्धाची पद्धत सुरू करायला हरकत नाही. त्यामुळे खेळाडूंची तंदुरुस्ती, फॉर्म आदी गोष्टींची खरीखुरी चाचणी त्या वेळी होऊ शकते. अलीकडे युकी भांब्रीने दुखापतीमुळे डेव्हिस किंवा अन्य सांघिक स्पर्धेतून माघार घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पेस असो किंवा भांब्री असो, सर्व खेळाडूंना एकाच मापातून तोलले पाहिजे तरच संघातील खेळाडूंमध्ये अहंकारी वृत्ती दिसणार नाही व पर्यायाने पेस-भूपती यांच्यामधील वादासारख्या घटना यापुढे होणार नाहीत. संघटनेने याबाबत कचखाऊ धोरण न स्वीकारता गंभीर भूमिकाच घेतली पाहिजे. निदान देशातील टेनिस क्षेत्राची शान राखली जाईल अशीच भूमिका त्यांनी ठेवली पाहिजे.

 

मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com