प्राणायाम, योगासनं म्हटलं की काहीतरी गंभीर, कठीण अशी आपल्यापैकी अनेकांची समजूत असते. टीव्हीवर दिसणाऱ्या आध्यात्मिक वाहिन्यांच्या माध्यमातून प्राणायामची प्रात्यक्षिकेही पाहायला मिळतात. मात्र प्राणायाम म्हणजे नक्की काय, योगासनं नक्की करतात तरी कशी, या सगळ्यामागचा विचार काय? असे अनेक प्रश्न डोक्यात फेर धरतात. या सगळ्या प्रश्नांची उकल करणारे पुस्तक म्हणजे ‘प्राणायाम’.
अ‍ॅड. अरुण देशमुख लिखित या पुस्तकात योगासनं, प्राणायाम यासंदर्भात वाचकांना सोप्या आणि सुटसुटीत भाषेत या संकल्पनांची माहिती करून दिली आहे. प्राणायाम, तो करण्यासाठीची प्राथमिक तयारी, योगासने, शरीराला उपयुक्त आसने, त्राटक, कपालभाती, श्वसन, ओंकारसाधना, बंध आणि मुद्रा, षड्चक्र अशा स्वतंत्र प्रकरणांद्वारे सखोल माहिती देण्यात आली
आहे.
‘आजार झाला, घे औषध’ अशा स्वरूपाची प्राणायाम ही रचना नसून ती एक जीवनपद्धती आहे. आजार झाल्यानंतर धावाधाव करण्यापेक्षा आजार होऊ नये, यासाठी ही जीवनप्रणाली आहे. जटिल भाषेत वर्णनाऐवजी प्राणायाम-योगासने कशी करावीत, याची सचित्र माहिती देण्यात आली आहे. मात्र पुस्तकातील छायाचित्रे अधिक चांगली असती, तर वाचकांना आसन समजणे सुलभ झाले असते. सचित्र रचनेमुळे वाचकांना त्यानुसार प्रात्यक्षिके करता येऊ शकतील. विशिष्ट आसन करण्याची पद्धत, त्यातून होणारे फायदे, घ्यावयाची काळजी अशा टप्प्यांमध्ये विवरण दिल्याने वाचकांना ते सहजपणे समजू शकते आणि आचरणात आणता येते.  
पुस्तकाचे नाव : प्राणायाम
लेखक : अ‍ॅड. अरुण देशमुख
प्रकाशन : मनोरमा प्रकाशन
किंमत : १२५ रुपये