मर्सिडीझ संघाच्या लुइस हॅमिल्टनने गेल्या वर्षी एफ-वन विश्वावर अधिराज्य गाजवले. एकतर्फी मुकाबल्यात हॅमिल्टनने बहुतांशी शर्यतीत अव्वल स्थान राखले. शर्यतपटूंमधील चुरस वाढावी आणि एफ-वन शर्यतीची लोकप्रियता वाढावी यादृष्टीने एफ-वन शर्यतींमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. या बदलांमुळे विश्वविजेत्या हॅमिल्टनची सद्दी मोडली जाणार आहे. त्यामुळे हॅमिल्टन या बदलांना राजी नाही.
एफ-वन आयोग आणि धोरण समितीची जिनेव्हा येथे बैठक झाली. या बैठकीत पात्रता फेरीच्या स्वरूपात बदल करण्यावर सहमती झाली आहे. पात्रता फेरीच्या तीन शर्यतीत, संथगतीच्या शर्यतपटूंची गच्छंती करण्यात येणार आहे. पहिला टप्पा १६ मिनिटांचा, दुसरा १५ तर तिसरा १४ मिनिटांचा असणार आहे. खेळ वेगवान आणि आकर्षक व्हावा असा यामागचा विचार आहे.
‘‘या बदलांना अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी शर्यतपटूंचे मत लक्षात घ्यायला हवे. गाडय़ांचा वेग वाढवायला हरकत नाही परंतु संकरित अर्थात हायब्रिड स्वरूपाच्या गाडय़ांचा उपयोग ही खरी समस्या आहे. नवे बदल स्वीकारार्ह नाहीत. स्वतंत्र स्वरूपाच्या गाडय़ा मिळाल्यास बदलांना अर्थ प्राप्त होईल,’’ असे हॅमिल्टनने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘आतापर्यंत गाडीचे वजन ६०० किलो होते. आता ते आणखी १०० किलोने वाढणार आहे. हा मुख्य बदल आहे. वेग वाढवण्यासाठी या बदलांची गरज नाही. गाडीच्या वजनाने समस्या निर्माण होतात. जास्त वजनाने टायरवर दाब निर्माण होतो. हलक्या गाडय़ा उपलब्ध झाल्यास उपयोगी ठरेल. एफ-वन विश्वात १० ते १५ वर्षांचा अनुभव असलेले शर्यतपटू आहेत. त्यांचे मत विचारात घेण्याची आवश्यकता आहे.’’ नवीन बदलांना मंजुरी मिळण्याची तारीख ३० एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. २०१७ वर्षांतील पहिल्या शर्यतीपासून हे बदल अमलात येण्याची चिन्हे आहेत.