शिखर धवनच्या नाबाद ६२ धावांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने सोमवारी मुंबई इंडियन्सवर सात विकेटने विजय प्राप्त केला. मुंबईने दिलेले १३९ धावांचे कमकुवत आव्हान हैदराबादने १० चेंडू राखून गाठले. खरंतर मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला होता. डेव्हिड वॉर्नरला स्वस्तात माघारी धाडण्यात मुंबईला यश आले होते. पुढे हेन्रीकस आणि धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. हेन्रीकसने ३५ चेंडूत ४४ धावा ठोकल्या. हेन्रीकस बाद झाल्यानंतर युवराजही(९) स्वस्तात माघारी परतला होता. धवनने अखेरपर्यंत मैदानात ठाण मांडून संघाला विजय प्राप्त करून दिला. व्ही. सुंदर १५ धावांवर नाबाद राहिला.

तत्पूर्वी, टॉस जिंकून फलंदाजी स्विकारलेल्या मुंबई इंडियन्सला २० षटकांच्या अखेरीस ७ बाद १३८ धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादच्या गोलंदाजांनी सामन्याच्या सुरूवातीपासूनच मुंबईच्या फलंदाजीवर चांगला वचक ठेवून धावसंख्येला लगाम घातला होता. मागील सामन्यात अर्धशतकी काामगिरी करणाऱ्या सिमन्सला(१) स्वस्तात माघारी धाडले. हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणारा अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी याने सिमन्सला क्लीनबोल्ड केले. तर नितिश राणा देखील स्वस्तात बाद झाला. पुढे पार्थिव पटेल(२३) झेलबाद झाला. ३ बाद ३६ अशी केविलवाणी अवस्था असताना कर्णधार रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी संघाला सावरले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. रोहित शर्माने ४५ चेंडूत ६७ धावांची खेळी साकारली. तर पांड्या २४ चेंडूत १५ धावा ठोकून बाद झाला. अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारने चांगली गोलंदाजी केली. हैदराबादसमोर विजयासाठी १३९ धावांचे कमकुवत आव्हान आहे. हैदराबादकडून चार षटकांत २४ धावा देऊन ती विकेट घेतल्या, तर भुवनेश्वर कुमारने दोन विकेट घेतल्या.