मुंबई इंडियन्सने यंदा गुणतालिकेतील आपल्या अव्वल स्थानाला साजेसा खेळ करत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या ‘क्लालिफायर-२’ मध्ये विजयाचा ‘रोशगुल्ला’ चाखला. कोलकाताने दिलेले १०८ धावांचं कमकुवत आव्हान मुंबईने ६ विकेट्स आणि पाच षटकं राखून गाठलं. अंतिम फेरीत आता मुंबई आणि पुणे पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. यंदा मुंबई इंडियन्सला पुण्याविरुद्ध विजय प्राप्त करता आलेला नाही. अंतिम फेरीत दाखल झालेल्या दोन्ही महाराष्ट्राच्या संघांमध्ये रविवारी हैदराबादच्या स्टेडियमवर चुरशीची लढत पाहायला मिळेल.

सामन्याचा टॉस मुंबई इंडियन्सने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मुंबईच्या गोलंदाजांनी रोहित शर्माचा निर्णय सार्थ ठरवत कोलकात्याचा अवघ्या १०७ धावांत खुर्दा उडवला. फिरकीपटू कर्ण शर्माने ४ षटकांत केवळ १६ धावा देऊन ४ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराने तीन षटकात ७ धावा देऊन तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल जॉन्सनेही कोलकाताच्या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केलं.

मुंबईच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यात मारा करत कोलकाताच्या फलंदाजांना चांगलीच वेसण घातली. विस्फोटक ख्रिस लिन, सुनील नरेन आणि रॉबीन उथप्पा सुरूवातीला तंबूत दाखल झाले. सध्या चांगल्या फॉर्मात असलेल्या गौतम गंभीरने मैदानात जम बसवण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी तो अपयशी ठरला. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो डीप मिड विकेटवर झेलबाद झाला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर कर्ण शर्माने आणखी एक विकेट घेऊन कोलकाताला धक्का दिला. अवघ्या ३१ धावांत कोलकाताचे पाच फलंदाज तंबूत दाखल झाले होते. पुढे सुर्यकुमार यादव आणि इशांक जग्गीने अर्धशतकी भागीदारी रचून संघाला सावरलं. कर्ण शर्माने ही जोडी फोडून मुंबईला सामन्यात पुनरागमन करून दिलं. सुर्यकुमार-जग्गी जोडी फुटल्यानंतर कोलकाताचा डाव पूर्णपणे कोसळला आणि १९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कोलकाताचा डाव १०७ धावांतच संपुष्टात आला.

प्रत्युत्तरात, कोलकाताने मुंबईच्या तीन फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडून सामन्यात रंगत आणखी खरी पण त्याचा काही टीकाव लागू शकला नाही. रोहित शर्मा आणि कुणाल पंड्याने चौथ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचली. रोहितने २६ धावा केल्या, तर कुणाल पंड्याने सर्वाधिक नाबाद ४५ धावांची मॅच विनिंग खेळी साकारली.