युरोपियन विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेच्या अ-गटात नेदरलँड्सने बेलारूसवर ३-१ असा शानदार विजय मिळवला असला तरी त्यांच्या पात्रतेच्या आशा अधांतरी आहेत. आता गटातील अव्वल दोन स्थानांवर राहण्यासाठी नेदरलँड्सला अखेरच्या सामन्यात विजयाची नितांत आवश्यकता आहे.

मध्यरक्षक डॅव्ही प्रॉपेरने २५व्या मिनिटाला नेदरलँड्सचा पहिला गोल नोंदवला. मग कर्णधार अर्जेन रॉबेनने ८४व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे दुसरा गोल केला. नंतर भरपाई वेळेत तिसऱ्या मिनिटाला मेमफिस डीपेने तिसरा गोल साकारला. १९८६नंतर प्रथमच नेदरलँड्सचे विश्वचषकाचे पात्रतेचे भवितव्य अधांतरी आहे. २०१६च्या युरोमध्येही ते भाग घेऊ शकले नव्हते.

फ्रान्स गटात अव्वल

पॅरिस : ब्लासी मॅटय़ुडीने सुरुवातीलाच साकारलेल्या गोलच्या बळावर फ्रान्सने बल्गेरियाला १-० असे हरवून गटातील अव्वल स्थान टिकवले आहे. मध्यरक्षक मॅटय़ुडीने तिसऱ्याच मिनिटाला अप्रतिम गोल साकारून फ्रान्सला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बल्गेरिला डोके वर काढणे कठीण गेले.

कोस्टा रिका पात्र

सॅन जोस : भरपाई वेळेत केंडाल वॉटसनने हेडरद्वारे साकारलेल्या प्रेक्षणीय गोलच्या बळावर कोस्टा रिकाने होंडुरासला बरोबरीत रोखले आणि विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान मिळवला.

एडी हर्नाडिझने ६६व्या मिनिटाला हेडरनिशी होंडुरासचे खाते उघडले. मात्र भरपाई वेळेतील पाचव्या मिनिटाला ब्रायन रुईझच्या क्रॉसवर वॉटसनने आश्चर्यकारक गोल साकारून कोस्टा रिकाचे स्वप्न पूर्ण केले.

नायजेरिया पात्र

अबुजा : अ‍ॅलेक्स इवोबीच्या गोलमुळे पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी आफ्रिकन खंडातून पात्र होण्याचा पहिला मान नायजेरियाने मिळवला आहे.  इवोबीने ७३व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे नायजेरियाने झाम्बियाचा १-० असा पराभव केला.

घानाचे आव्हान संपुष्टात

अबुजा : २०१०मध्ये झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या घानाचे पात्रता स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. युगांडाविरुद्धची लढत त्यांनी गोलशून्य बरोबरी सोडवली.