|| धनंजय रिसोडकर

आठवडय़ाची मुलाखत : के.टी.इरफान ऑलिम्पिकपात्र अ‍ॅथलीट

ऑलिम्पिकमध्ये मी २०१२ सालीदेखील पात्र ठरलो होतो. मात्र त्या वेळी तो पहिलाच अनुभव असल्याने पात्रता मिळवणेच मोठी बाब वाटत होती. मात्र आता २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी जवळपास सव्वा वर्ष आधीच पात्रता मिळवता आल्याचा आनंद अधिक मोठा आहे. कारण त्या स्पर्धेसाठी सव्वा वर्षांचा काळ तयारीसाठी मिळणे, हेच माझ्यासाठी निर्णायक ठरू शकते, असा विश्वास असल्याचे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सर्वप्रथम पात्र ठरलेला २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेतील भारताचा अव्वल शर्यतपटू के. टी. इरफान याने सांगितले.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी अनेक भारतीय खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अशा परिस्थितीत अ‍ॅथलेटिक्समध्ये सर्वप्रथम पात्रता मिळवण्यात केरळच्या मल्लपुरमचा इरफान हा यशस्वी ठरला आहे. त्या पाश्र्वभूमीवर त्याच्याशी झालेल्या संवादात त्याने या यशासह भविष्यातील योजनांबाबतची त्याची मते मांडली.

  • ऑलिम्पिक पात्रता गाठणे या यशाला किती महत्त्व देतोस?

ऑलिम्पिकची पात्रता मिळवणे, हे यश नक्कीच मोठे असते. मात्र तेवढय़ावर समाधानी राहून चालणार नाही, कारण हा टप्पा मी कारकीर्दीत दुसऱ्यांदा गाठत आहे. सर्वप्रथम लंडन ऑलिम्पिकमध्ये २०१२ साली मी २० किलोमीटरच्या शर्यतीत सहभागी झालो होतो. त्या वेळी मी माझी सर्वोत्तम वेळ देऊनदेखील दहावा आलो होतो. त्यानंतर २०१६ साली काही अन्य कारणांमुळे मी ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवू शकलो नव्हतो. त्यामुळे यंदा पुन्हा पात्रता मिळवली आणि तीदेखील सव्वा वर्ष आधी हे माझ्या दृष्टीने नक्कीच मोठे यश आहे.

  • लंडनपासून टोक्योच्या ऑलिम्पिकपर्यंत तुझ्या खेळात कितपत बदल झाला आणि त्याचा तुला कशा प्रकारे फायदा होईल, असे वाटते?

लंडन ऑलिम्पिकच्या वेळी मी अगदीच नवखा होतो. त्यामुळे त्या नवखेपणात उत्साह जास्त आणि विचाराची उणीव असते. तशीच काहीशी माझी स्थिती होती. आता अत्याधुनिक तंत्र तसेच तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन अशा अनेक बाबींमुळे माझ्या खेळात सुधारणा झाली आहे. तसेच पुढील वर्षभरात त्यात अधिकाधिक काळ सराव आणि पुरेशी विश्रांती घेऊन स्वत:ला अंतिम क्षणी ताजेतवाने राखण्यावर भर देण्याचे शहाणपण आता अंगात आले आहे. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात ज्या त्रुटी राहिल्या होत्या, त्यावर मात करण्याला मी प्राधान्य देणार आहे.

  • अ‍ॅथलेटिक्समध्ये भारतीय फारसे चमकताना का दिसत नाहीत?

अ‍ॅथलेटिक्समध्ये शारीरिक संरचना, अत्याधुनिक सामग्रीसह प्रशिक्षण आणि प्रचंड परिश्रम घेण्याची तुमची तयारी या तिन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. ज्या वयात मेहनत आणि दिशा ठरवून प्रयास होणे अपेक्षित असते, अशा शालेय स्तरापासून आपल्याकडे अ‍ॅथलेटिक्ससाठी फारशी मेहनत घेतली जात नाही. त्यामुळे मग खेळाडू १५-१६ वर्षांचा झाल्यानंतर अचानकपणे मेहनत करायला लागून तो फार मोठा अ‍ॅथलिट होऊ शकत नाही. त्यासाठी वयाच्या ८-९व्या वर्षांपासूनच त्या दृष्टीने प्रयास होणे आवश्यक आहे. तरी पण मध्यम पल्ल्याच्या शर्यतींसाठी भारतीयांची शरीररचना योग्य मानली जात असल्याने भविष्यात त्या क्षेत्रात भारत प्रगती करू शकेल, असे मला वाटते.

  • टोक्योत पदक मिळवण्याबाबत कितपत विश्वास वाटतो?

मी आता २९ वर्षांचा आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने ऑलिम्पिक मिळवण्याची ही अखेरची संधी आहे. त्यामुळे मी तर माझा सर्वोत्तम प्रयास करणार आहे. माझ्या वेळेत मला एक ते दीड मिनिट कपात केल्यास पदक नक्की मिळू शकते. तसेच मला मिळालेला सव्वा वर्षांचा कालावधी ही माझ्यासाठी सर्वात जमेची बाजू आहे. त्या कालावधीचा उपयोग करून घेत माझ्यासाठी आणि देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळवण्याचा माझा निर्धार आहे.