आठवडय़ाची मुलाखत : मोहित चिल्लर कबड्डीपटू

प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामासाठी सर्वाधिक ५३ लाखांची बोली जिंकणारा मोहित चिल्लर हा दिल्लीतील निझामपूरचा. भारतीय कबड्डीला वैभवाचे दिवस दाखवणारे राकेश कुमार आणि मनजीत चिल्लर हेसुद्धा याच गावचे. प्रो कबड्डीतील ४३ सामन्यांत पकडींचे १२२ गुण नावावर असणारा मोहित आता बंगळुरू बुल्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. कबड्डी खेळून कारकीर्द घडवता येते आणि आयुष्य पालटू शकते, इतका पैसासुद्धा या खेळात आहे, ही गोष्ट सर्वासाठीच प्रेरणादायी आहे, अशा भावना मोहितने प्रकट केल्या. मोहितच्या कबड्डीतील वाटचालीविषयी केलेली खास बातचीत-

  • इतकी मोठी आनंदाची बातमी घर आणि गावापर्यंत पोहोचल्यावर तेथील वातावरण कसे आहे?

प्रो कबड्डीच्या लिलावात एवढी मोठी बोली लागल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. माझे अभिनंदन करायला घरी येणाऱ्या प्रत्येकाला वडील मिठाईसुद्धा वाटत आहेत. कबड्डीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्या गावातसुद्धा या बातमीमुळे उत्साह संचारला आहे.

  • क्रिकेट हा जसा फलंदाजांचा खेळ, तसा कबड्डी हा चढाईपटूंचा खेळ मानला जायचा. परंतु प्रो कबड्डीच्या ताज्या लिलावाने हे खोटे ठरवले?

चढाईपटूंप्रमाणे बचावपटूंची खेळात महत्त्वाची भूमिका असते. प्रत्येक संघात तीन चढाईपटू आणि चार पकडपटू असे सर्वसाधारण समीकरण असते. प्रो कबड्डीच्या लिलावातील अव्वल दहा जणांमध्येही पकडपटूच अग्रेसर आहेत. प्रत्येक संघ आपला बचाव भक्कम करण्यासाठी उत्सुक आहे.

  • कबड्डीकडे कसा वळलास?

आमच्या घरात कबड्डीला अनुकूल वातावरण होते. माझे वडील आणि काका संजय चिल्लर दोघेही उत्तम कबड्डी खेळायचे. काका मला सराव आणि सामने पाहायला घेऊन जायचे. सात वर्षांपूर्वी मी कबड्डी खेळायला गांभीर्याने प्रारंभ केला. माझे वडील आणि माझा भाऊ सोमवीर शेखर हासुद्धा व्यावसायिक कबड्डी खेळतो.

  • कबड्डीत कारकीर्द घडवत असताना शिक्षण कसे सांभाळलेस?

दहावीला मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो, त्यामुळे विज्ञान शाखेची निवड केली. मग अभ्यास आणि खेळ अशा दोन्ही गोष्टींचा समतोल साधत अखेरच्या वर्षांपर्यंत पोहोचलो आहे.

  • कबड्डीमध्ये व्यावसायिक कारकीर्द सुरू झाल्यावर तुझ्यातील कौशल्याला कोणी पैलू पाडले?

दिल्लीकडून राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत खेळण्यासाठी मोठी स्पर्धा असल्यामुळे मला त्या वेळी सारेच बिकट वाटत होते. परंतु नवनीत गौतमने त्या वेळी मला राजस्थानकडून खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याचेच मार्गदर्शन वेळोवेळी मला मिळत गेले. गेल्या काही वर्षांत यू मुंबाचे प्रशिक्षक रवी शेट्टी आणि के. भास्करन यांनीसुद्धा मला मोलाचे धडे दिले.

  • भविष्यात कोणते स्वप्न जोपासले आहे?

गेल्या वर्षी दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघाचे मी प्रतिनिधित्व केले. तो अनुभव आत्मविश्वास उंचावणारा ठरला. आता आशियाई क्रीडा स्पध्रेत आणि विश्वचषकात भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याचे स्वप्न जोपासले आहे.

  • मागील तीन हंगामांमध्ये यू मुंबाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आता बंगळुरू बुल्सकडून खेळणे, हे भावनिकदृष्टय़ा किती आव्हानात्मक असते?

यू मुंबा संघाला तीन वर्षांनंतर सोडताना अतिशय दु:ख होते आहे. या संघासोबत अनेक सुखदु:खाचे क्षण घालवल्यामुळे एका कुटुंबाप्रमाणेच आम्ही एकत्रित होतो. शेवटी कबड्डी हे एक मोठे कुटुंब आहे. बंगळुरू संघातीलसुद्धा सारेच जण माझ्यासोबत खेळलेले आहेत. आता सराव सत्रात योग्य योजना आखून विजेतेपदासाठी प्रयत्न करू.